एलबीटी विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला व्यापाऱ्यांनी पुन्हा दोन दिवसांचा बंद करण्याचे ठरविले असून त्यामध्ये कोल्हापुरातील व्यापारी सहभागी होणार आहेत. दोन-तीन दिवसांमध्ये व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक घेऊन बंदमधील सहभागाची दिशा स्पष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर यांनी दिली आहे.    
एलबीटीच्या विरोधात व्यापारी वर्ग पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. पावसाळी अधिवेशन १५ जुलै रोजी सुरू होणार आहे. १५ व १६ जुलै रोजी राज्यव्यापी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासन एलबीटीचा पुनर्विचार करत नाही, चर्चेचा मार्गही बंद केलेला आहे. एलबीटीबाबत संयुक्त समिती स्थापन करण्याचे आश्वासन पाळलेले नाही. एलबीटीबाबत शासन कसलीच भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात व्यापाऱ्यांनी एलबीटी विरोधात रान उठविण्याचे ठरविले आहे.    
व्यापाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बंदच्या निर्णयाचे स्वागत कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी केले आहे. या बंदमध्ये सर्व व्यापारी संघटना सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी दोन दिवसांत सर्व संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असेही ते म्हणाले. एलबीटी विरोधात गेल्या महिन्यात शहरातील व्यापाऱ्यांनी १० ते २१ तारखेपर्यंत आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा दोन दिवस बंदचे आंदोलन होणार आहे.