यंत्रमाग कामगारांच्या प्रश्नाबाबत बुधवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आता उद्या शुक्रवारी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये पुन्हा एकदा बैठक होत आहे. कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सलग दुसऱ्या बैठकीत निर्णय होतो का याकडे लक्ष वेधले आहे.
यंत्रमाग कामगारांना १० हजार रुपये वेतन मिळावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय यंत्रमाग कामगार कृती समितीच्या वतीने महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. त्याची दखल घेऊन काल मुंबईत मुश्रीफ यांनी बैठक घेतली होती. या वेळी यंत्रमाग प्रतिनिधींनी दरमहा १० हजार रुपये वेतनाची मागणी अमान्य करून देशभरात प्रचलित असलेल्या पीस रेट पद्धत पुढे चालू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मजुरीत ५ पैसे वाढ देण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला. अवघ्या ५ पैशाची मजुरी वाढ देण्याचा प्रस्ताव सादर झाल्याने कामगार प्रतिनिधी संतप्त झाले. त्यामुळे बैठकीत शाब्दिक जुगलबंदी झाली. कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपती घ्यावी लागली होती.
मुश्रीफ यांनी यासंदर्भात शनिवारी कोल्हापूर बैठक घेणार असल्याचे काल स्पष्ट केले होते. मात्र त्यामध्ये आता बदल झाला असून उद्या शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीस मुश्रीफ, जिल्हय़ातील खासदार, आमदार, यंत्रमागधारक प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी, सहायक कामगार आयुक्त बी. डी. गुजर आदींचा समावेश आहे.