डोंबिवलीतील महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता असलेल्या लोकमान्य टिळक चौक (पारसमणी) ते घरडा सर्कल रस्त्यावर पुन्हा वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. कल्याण, शिळफाटा रस्त्याकडे जाणारी बहुतांशी वाहने या रस्त्यावरून ये-जा करतात. महापालिकेने मंजुनाथ शाळा ते शेलार चौकदरम्यान काँक्रिटीकरणाच्या कामासाठी हा रस्ता खणल्याने या भागात अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
डोंबिवलीतून शहराबाहेर जाणारे दोन मुख्य रस्ते म्हणजे एक मानपाडा तर  दुसरा टिळक चौक रस्ता. गेल्या आठवडय़ात महापालिकेच्या प्रकल्प विभागाने मानपाडा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी खणल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक, नागरिकांची कोंडी झाली आहे. हे कमी होते म्हणून मंजुनाथ शाळा ते शेलार चौकापर्यंतचा रस्ता खणण्यात आल्याने डोंबिवलीकरांची चहूबाजूंनी नाकाबंदी झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून दुपदरी वाहतूक होत होती. तरीही या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत असते. सोमवारपासून डाव्या बाजूचा रस्ता खणून ठेवल्याने वाहने एकाच बाजूने ये-जा करीत आहेत. या भागात पर्यायी रस्ता नसल्याने शाळेच्या बस, कंपनीच्या बस, दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यावर अडकून पडतात. प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता विभागाकडून झालेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका नागरिकांना बसत असल्याची टीका सर्व पक्षीय नगरसेवकांकडून केली जात आहे. मानपाडा रस्ता फडके चौकापासून काँक्रिटच्या कामासाठी खणून ठेवल्याने बहुतांशी वाहने टिळक चौकातून घरडा सर्कलमार्गे शहराबाहेर जात होती. ही वाहने महापालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे कोंडीत सापडली आहेत. मानपाडा रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंजुनाथ शाळेजवळील रस्त्याचे काम हाती घेणे आवश्यक होते. असे असताना दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू करण्यात आल्याने डोंबिवलीकर वाहतूक कोंडीच्या जंजाळात सापडले आहेत. फडके चौक ते शिवसेना शाखेदरम्यान काही इमारती रस्त्याच्या आड येतात. टिळक चौक ते मंजुनाथ शाळेदरम्यान काही इमारती अशाच अडसर ठरल्या आहेत. हे अडथळे पार करण्यासाठी प्रकल्प विभाग अशा पद्धतीने काम करीत असल्याची टीका होत आहे.
पर्यायी रस्ता
टिळक चौक ते घरडा सर्कल रस्ता वाहतूक कोंडीचे आगार ठरणार असल्याने वाहन चालकांना स. वा. जोशी शाळा, ठाकुर्लीतील हनुमान मंदिर ते खंबाळपाडा रस्त्याने कल्याणच्या दिशेने जाता येईल. एकाच वेळी अनेक वाहने ठाकुर्लीत आली तर हनुमान मंदिर भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मंजुनाथ शाळा, दत्तमंदिर, गोग्रासवाडी रस्त्याने वाहनचालकांना शिळफाटय़ाकडे जाता येईल. टिळक चौकातून संत नामदेव पथावरून शहराबाहेर जाता येणार आहे. आतापर्यंत काँक्रिटीकरणाची १० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या कामांची व्हीजेटीआयमधील तज्ज्ञांतर्फे चौकशी करण्यात येणार आहे. यापुढे उर्वरित ९० टक्के कामांमध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त शंकर भिसे यांनी डोंबिवलीतील एका बैठकीत दिल्या आहेत.