News Flash

भाजपला हव्यात समान जागा, अन्यथा वेगळा विचार

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीत जागांचे समसमान (५०-५० टक्के) वाटप व्हायला हवे आहे. भाजपची शहरात ताकद वाढलेली असल्याने जागा वाटप सन्मानजनकच व्हायला

| September 2, 2013 01:52 am

 महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीत जागांचे समसमान (५०-५० टक्के) वाटप व्हायला हवे आहे. भाजपची शहरात ताकद वाढलेली असल्याने जागा वाटप सन्मानजनकच व्हायला हवे. युतीत जागा वाटप समान पद्धतीने झाले नाही तर भाजपला निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, अशी आक्रमक भूमिका भाजपचे निवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी रविवारी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत जाहीर केली.
पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शहरातील कार्यकर्ते तसेच विविध संस्था, संघटनांच्या वतीने आगरकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे, संघटक सरचिटणीस सुनील रामदासी, नगरसेवक शिवाजी लोंढे, अनंत जोशी आदी उपस्थित होते.
मनपाची निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढवली जाईल, युती तुटणार नाही, असे स्पष्ट करून व यापूर्वीच्या मनपाच्या निवडणुकीत मित्रपक्षाने काही ठिकाणी जाणूनबुजून भाजपच्या विरोधात माणसे उभी केली याकडे लक्ष वेधून आगरकर म्हणाले, की याचा अर्थ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आमच्या विरोधात उमेदवार उभा करावा किंवा मैत्रिपूर्ण लढत व्हावी हे अभिप्रेत नाही, मित्र फसवत नाही व विश्वासघातही करत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. मागील वेळी शिवसेनेला अधिक जागा देऊनही त्यांचे कमी उमेदवार निवडून आले व भाजपला कमी जागा मिळूनही अधिक उमेदवार निवडून आले. आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. जागांचे समान वाटप झाल्यावर महायुतीतील रिपाइंला कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल.
आगरकर यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली याचा अप्रत्यक्ष संदर्भ देऊन ते म्हणाले, की माझ्या वैयक्तिक संबंधाचा युतीवर कोणताही परिणाम होणार नाही, पक्षहितासाठी आपण कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहोत, माझ्या नियुक्तीनंतर अनेक शिवसैनिक मला भेटले, त्यांनी अभिनंदनही केले, त्यामुळे इतरांनी काळजी करण्याचे कारण नाही.
शहर भाजपची विस्कटलेली घडी बसवण्यास आपले प्राधान्य राहील, त्यासाठी नेतृत्वात सुसंवाद व कार्यकर्त्यांत समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, पत्रक पुढारी व घरी बसून काम करणाऱ्यांना स्थान राहणार नाही, आपण रोज दोन तास सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत कार्यालयात उपस्थित राहू, असेही आगरकर म्हणाले. घडी विस्कटण्याचे कारण काय, या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण मागू नका व इतिहास उगाळू नका, असे उत्तर दिले. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्याबरोबर आपले कोणतेही मतभेद नाहीत, ते आपले चांगले मित्र आहेत, असेही आगरकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 दहशतमुक्तीचा नव्हे तर विकासाचा मुद्दा
निवडणूक दहशतमुक्तीच्या मुद्यावर नाही तर नगर शहर विकासाच्या मुद्यावरच लढवली जाईल. मित्रपक्षानेही याच विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी केले. विकास म्हणजे केवळ रस्ते, गटारी, पाणी नाही तर सर्वागीण विकास, सध्या शहरातील तरुणवर्ग संधी उपलब्ध होत नसल्याने मोठय़ा प्रमाणावर पुणे-मुंबईत जातो आहे. चांगली वाहतूक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम अशा सर्व बाबींचा विकास अपेक्षित आहे, असेही आगरकर यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:52 am

Web Title: agarkar demands for 50 seats in mnc election
टॅग : Demand,Seats
Next Stories
1 शहर भाजपमध्ये आगरकर यांनी ‘कारभा-या’ची भूमिका बजवावी- फरांदे
2 न्यायालयापुढे हक्क सांगणारे कर्तव्याबद्दल बोलत नाहीत- न्या. जोशी
3 कराडात गुलाल व डॉल्बीला बंदी – घट्टे
Just Now!
X