गेल्या पंचवीस वर्षांपासून भुखंड माफियांविरूद्ध आम्ही लढा देत आहोत. माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या भमिकेमुळे आमच्या चळवळीला बळ मिळाले. यापुर्वीच त्यांनी भुमिका घेतली असती तर  भुखंड माफिया सत्तेतून हद्दपार करता आले असते, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी केले.
शेती महामंडळाच्या जमिनीवर शहरालगत आरक्षण टाकू नका. भुखंड माफियांचे शहरालगतच्या जमिनींवर लक्ष असुन खंडकऱ्यांकडून काही काँग्रेस कार्यकर्ते खंडणी गोळा करत आहेत, असा आरोप विखे यांनी केला होता. त्यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चित्ते यांनी म्हटले आहे, शहरात मध्यमवर्गीय माणूस जागा घेऊ शकत नाही. दीड लाखात घर बांधण्याचे स्वप्न संपले आहे. शहराची प्रगती नसताना जागेचे भाव भुखंड माफियांनी दहा लाखांवर नेले. हा भस्मासूर गाडण्याचा प्रयत्न आम्ही केला. नगरपालिका निवडणुकीतच विखे यांनी आशिर्वाद दिला असता तर आमची चळवळ यशस्वी झाली असती, थोडक्यात संधी हुकली. आता विखे यांनी भुखंड माफियांना ओळखले आहे.
भुखंड माफिया अन्य शहरातही गेले आहेत. ज्यांच्या आशिर्वादावर जे उभे राहिले तेच आता भस्मासुरासारखा त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला निघाले आहेत. त्यांच्या खंजीर निशाणीचा झटका माजी आमदार ज. य. टेकावडे, माजी खासदार गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना बसला. आता विखेंच्या विरूद्ध त्यांनी आपली निशाणी वापरण्यास प्रारंभ केला आहे. पण, त्याआधीच विखे यांनी त्यांना ओळखले. मात्र या ओळख परेडला थोडा उशीर झाला, अशी खंत चित्ते यांनी पत्रकात व्यक्त केली.