‘मंत्री, खासदार गावाला काय उपयोग शहराला’, असा उपहासपूर्ण सवाल फलकावर उपस्थित करून महापालिकेच्या विरोधात बुधवारी कर भरण्यास नकार देणारे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर ‘नो कर’ आंदोलन अशा आशयाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास क्रांती चौकात हे आंदोलन केल्यानंतर महापालिकेस निवेदन देण्यात आले. यात जायंट्स ग्रुपला १५ लाख रुपये देण्याच्या प्रस्तावित निर्णयावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
शहरात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने कर न भरण्याचा निर्णय घेतल्याचे शहरातील दीड हजार नागरिकांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना पूर्वीच कळविले होते. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे आंदोलनात कार्यकर्त्यांनी फलकावर बोचऱ्या टीकेचा मजकूर लिहून लक्ष वेधले. ‘खड्डय़ात गेला रस्ता, जीव झाला सस्ता’, ‘कर द्यायचा कशाला-कोरड पडली घशाला’, अशा नव्या घोषवाक्यांचा वापर केला होता. आंदोलनाच्या अनुषंगाने दिलेल्या निवेदनातही आयुक्त हर्षदीप कांबळे यांचे रस्ता, पाणी, कचरा या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
रस्त्यांच्या प्रश्नावरून जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी या आंदोलनास सुरुवात केली. आंदोलनात आता वेगवेगळय़ा क्षेत्रांतील लोक सहभागी होत असून, बुधवारी वकीलही यात सहभागी झाले होते. कराचा महापालिका योग्य उपयोग करीत नसल्याचा आरोपही करण्यात आला. जायंट्स इंटरनॅशनल संस्थेला आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी महापालिकेने १५ लाख रुपये देऊ केले आहेत. तसेच संतसृष्टीसाठी मंजूर केलेले ५ कोटी रुपयेही नाहक असल्याचा आरोप करण्यात आला. मुळात जी उद्याने आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यासाठी कोणताही निधी नाही. त्यामुळे वापर होणाऱ्या कराच्या पशावर न बोललेलेच बरे, अशी टीका करण्यात आली. आवश्यक बाबींवर पसे खर्च न करता केली जाणारी ही उधळपट्टी निषेधार्ह असल्याची टीका आंदोलनादरम्यान करण्यात आली.
सत्ताधारी व विरोधक दोघेही सत्ता उपभोगत असून, सामान्य जनताच विरोधी पक्षात असल्याचा उल्लेखही निवेदनात आहे. श्रीकांत उमरीकर यांच्यासह दिनकर बोरीकर, सारंग टाकळकर, महेश भोसले, प्रसाद अकोलकर, प्रकाश जेऊरकर आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.