13 August 2020

News Flash

दलित हत्याकांडाविरोधात बसपातर्फे मोर्चा

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावात घडलेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

| October 28, 2014 07:12 am

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील जावखेडे गावात घडलेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मेहेर चौकात मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला. अहमदनगर जिल्ह्यास दलित अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
बसपाचे जिल्हाध्यक्ष अरुण काळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सादर केले. काही वर्षांपूर्वी खैरलांजी येथे मोठे दलित हत्याकांड झाले होते. त्यानंतर पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जाधव या दलित कुटुंबाची निर्घृण हत्या करण्यात आली. जाधव कुटुंबीयांचे तुकडे तुकडे करून त्याचे अवयव इतरत्र टाकण्यात आले. हा संपूर्ण प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा आहे. या घटनेमुळे सत्ताधारी पक्षाविषयी असलेली मानसिकता तसेच सत्तेत येण्यापूर्वीच केलेला इशारा दलित जनतेला कळून चुकला आहे. हा हल्ला संविधानावर झालेला आहे. तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सत्ता काळात हत्याकांड झाले. भाजप आणि सेनेने सत्ता हातात घेण्यापूर्वीच दलितांवर अत्याचारास सुरुवात झाल्याचा आरोप बसपाचे जिल्हाध्यक्ष काळे यांनी केला. दलितांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढ होत आहे. या घटना न थांबल्यास रस्त्यावर उतरून आमची लढाई लढावी लागेल, कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा बसपाने दिला आहे. पाथर्डी येथे घडलेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर, अहमदनगर जिल्हा अत्याचारग्रस्त जाहीर करावा, जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करावी, ज्या जातीयवादी लोकांकडून हे हत्याकांड घडविले आहे त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येत असताना मोर्चेकऱ्यांनी मेहेर चौकात वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधितांना पुढे मार्गस्थ केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2014 7:12 am

Web Title: agitation against dalit massacre
टॅग Nashik
Next Stories
1 यंदा दीर्घकाळ गारव्याची चिन्हे
2 स्मशानभूमीत अंधश्रद्धेविरोधात दिवाळीचा प्रकाश
3 विविध संस्थांतर्फे गरजूंना दिवाळी फराळाचे वाटप
Just Now!
X