निफाड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरोधात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढून मागण्यांबाबत सकारात्मक विचार न झाल्यास संपूर्ण तालुक्यातील वीज भरणा केंद्र बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निफाड तालुक्यात महावितरण कंपनीचा गलथान कारभार सुरू असून शेतकऱ्यांची अडवणूक व पिळवणूक करणे हेच धोरण असल्याची तक्रार करत त्या विरोधात शिवसेनेने मोर्चाचे आयोजन केले होते. निफाड बाजार समितीच्या आवारातून आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात शिवसेनेचे तालुकाप्रमुख भागवत बोरस्ते, भाजप तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटील आदींसह शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. वीज पुरवठा करताना महावितरण दुजाभाव करत आहे. काही गावांना तीन दिवस तर काही गावांना चार दिवस वीज पुरवठा केला जातो. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना चार दिवस वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. रोहित्रावरून वीज जोडणी खंडित करणे बेकायदेशीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारे वीज पुरवठा खंडित न करण्याची सूचना केली होती. असे असताना महावितरण कंपनीकडून बेकायदेशीरपणे वीज जोडणी खंडित केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत देयके घेऊन जोडणी दिली गेली नाही, अशा शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम व्याजासह परत करुन शेतकऱ्यांना त्वरित वीज पुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ‘सिंगल फेजिंग’ योजनेंतर्गत मध्यरात्री तीन वाजता वीज पुरवठा खंडित केला जातो. हे प्रकार थांबविण्याची मागणीही करण्यात आली.
‘मीटर रीडिंग’ घेण्याच्या प्रक्रियेत गोंधळ आहे. ठेकेदार प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता अंदाजे देयके पाठवितात. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठय़ा प्रमाणात देयक आकारणी केली जाते. ठेकेदाराकडून सुरू असणारा गोंधळ त्वरित थांबविण्यात यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
तालुक्यातील विद्युत रोहित्र क्षमतेहून अधिक भाराचे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज जोडणी नाकारली जाते. अनेक ठिकाणी अधिक दाबामुळे रोहित्रात वारंवार बिघाड होतात. निधी नसल्यामुळे दुरुस्तीची ही कामे प्रलंबित आहेत. महावितरण कंपनी सक्तीची वसुली करत असून ती थांबविण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल अनेकांनी तक्रार केली. म्हाळसाकोरे व दावचवाडी येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.