धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांचे गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी डावी लोकशाही पुरोगामी आघाडीतर्फे ८ एप्रिलला मुख्यंत्र्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील रामगिरी बंगल्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाकपचे नेते व संयोजक मनोहर देशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुभाष मार्गावरून दुपारी १२ वाजता निघणाऱ्या या मोर्चाचे नेतृत्व भाकपचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो, माकपचे नरसय्या अडाम, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर, शेकापचे आमदार जयंत पाटील करणार आहेत. दाभोळकर आणि पानसरे यांना सर्वधर्मसमभाव असे धर्मनिरपेक्ष धोरण मान्य होते. अंधश्रद्धेतून समाजाला बाहेर काढणे, विज्ञाननिष्ट विवेक बुद्धीने संवाद साधून शोषणमुक्त असा समाज निर्माण करण्याचे व्रत घेऊन त्यांचा समाजसेवेचा प्रवास सुरू होता. लोकशिक्षणासाठी अनेक पुस्तकांच्या रूपात त्यांनी साहित्य निर्माण केले. परंतु त्यांचे पुरोगामी विचार न पटल्याने जातीयवादी शक्तींनी त्यांचा खून केला. डॉ. दाभोळकर यांचा खून होऊन दीड वर्षे तर पानसरे यांच्या खुनाच्या घटनेला दीड महिना लोटून गेला तरी आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत. यांच्या खुनामागे नथुराम गोडसे प्रवृत्तीचा हात असल्याचा आरोप या प्रकरणाचा तपास धर्मनिरपेक्ष अधिकाऱ्यांकडून केला जावा, अशी मागणीही देशकर यांनी याप्रसंगी केली.  
गोविंद पानसरे यांचा खून २५ लाखाची सुपारी देऊन करण्यात आला. यानंतर आरोपी कर्नाटकमध्ये पळून गेले, असे गृहखात्यातूनच सांगितले जात आहे. तेव्हा ही सुपारी कुणी दिली, त्याचे आरोपी कोण आहेत, हे सुद्धा गृहखात्याला माहीत असले
पाहिजे. असे असेल तर ती माहिती गृहखाते का देत नाही, असा सवालही देशकर यांनी उपस्थित केला.
 या मोर्चात भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी, अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉक, सी.पी.आय. (एम.एल.), भारिप बहुजन महासंघ, आर.पी.आय. (जी), बहुजन संघर्ष, जनसंघर्ष मंच, अ.भा. शिक्षण अधिकार मंच, सत्यशोधक शिक्षक सभा, जनता दल (यु), रिपब्लिकन आघाडी, आर.पी.आय. (सेक्युलर), रिपब्लिकन पँथर या राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला प्रामुख्याने मोहनदास नायडू, मधुकर मानकर, दिनेश बोरघाटे, अजय साहू, अ‍ॅड. मिलिंद पखाले उपस्थित होते.