जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राकडे काम करणाऱ्या आरोग्य परिचर यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आयटक कामगार केंद्र या संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. १०) रोजी सकाळी ११ वाजता टाऊन हॉल येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कॉ. बाबा यादव यांनी यावेळी दिली. परिचरांचे विविध प्रश्न शासन दरबारी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाच्या कोणत्याही सेवा-सुविधांचा लाभ त्यांना मिळत नाही. अपुऱ्या मानधनावर त्या आरोग्याची सेवा देत आहेत. वाढत्या महागाईने त्यांचे जीवन असह्य़ झाले आहे. सेवेत कायम करावे, मानधनात वाढ करावी या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. तरी या आंदोलनासाठी जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील सर्व आरोग्य परिचर यांनी या मोर्चात सहभागी व्हावे व मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष कॉ.बाबा यादव व सचिव कॉ. रघुनाथ कांबळे यांनी केले आहे.