क्रिकेट आणि सट्टेबाजी हे समीकरण आता रूढ झालेय. दोन वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मधील सट्टेबाजी मोठय़ा प्रमाणात समोर आली आणि अनेक दिग्गज, व्यावसायिक, बॉलीवूड कलावंतांचा सहभाग या सट्टेबाजीत असल्याचे स्पष्ट झाले. काहीशी थंडावलेली सट्टेबाजी पुन्हा जोमात सुरू झाली आहे. आगामी विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर या सट्टेबाजांना वेसण घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून धरपकड सुरू केली आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे सट्टेबाज भूमिगत झाले होते. अनेक सट्टेबाजांनी देशाबाहेर पळ काढलेला होता,  पण पुन्हा सट्टेबाज पाय रोवू लागले आहेत. सध्या तिरंगी क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्याच्यावरही मुंबईत सट्टेबाजी सुरू आहे. ३० जानेवारी रोजी भारत आणि इंग्लंड देशांदरम्यान होत असलेल्या क्रिकेट सामन्यावर मालाडमध्ये सट्टा सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले आणि त्यांच्या पथकाने मालाड पश्चिमेच्या भाद्रण नगर येथील एका दुमजली घरात छापा घातला. या छाप्यात विपुल सोनी (३८), कृपेश रुपारेलिया (३२) आणि समीर मकवाना (३२) या तीन कुख्यात सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी लागणारे साहित्य, १६ मोबाइल फोन, सिम कार्ड्स, टीव्ही संच, लॅपटॉप आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या सट्टेबाजांवर जुगार प्रतिबंधात्मक कायदा तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले. या सट्टेबाजांची पाळेमुळे संपूर्ण देशात पसरले असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, सट्टेबाजीला प्रतिबंध घालण्यासाठी गुन्हे शाखेने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. ती म्हणजे जामिनावर सुटलेल्या सट्टेबाजांना पुन्हा तुरुंगात पाठवणे. एकदा अटक झाल्यानंतर हे सट्टेबाज पुन्हा सक्रिय होतात. ते जर पुन्हा सट्टेबाजी करताना आढळले तर न्यायालयात अर्ज देऊन त्यांचा जामीन रद्द करण्याची ही योजना आहे. त्यासाठी सर्व गुन्हे शाखांकडून त्यांच्या हद्दीतील सट्टेबाजांची नावे मागविण्यात आलेली आहे. यामुळे सट्टेबाजांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या गुन्हे शाखेच्या हद्दीत मोठय़ा प्रमाणात सट्टेबाजी सुरू आढळली तर त्या संबंधित गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावरही कारवाई केली जाणार आहे. यामुळे पोलीस कारवाई कडक झाली आहे.