शिधापत्रिकेवर धान्य, पामतेल, रॉकेल यांचा पुरवठा व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने राधानगरी येथील तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. मोर्चातील महिलांनी पोलिसांचे कडे तोडून कार्यालयात प्रवेश केला. तहसीलदार रणजित देसाई हे चर्चेसाठी अनुपस्थित राहिल्याने त्यांचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
शिधापत्रिकेवर गहू, तांदूळ, पामतेल व रॉकेल यांचा पुरवठा व्हावा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने राधानगरी येथे आज मोर्चाचे आयोजन केले होते. बसस्थानकापासून मोर्चाला सुरूवात झाली. सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यास अपयशी ठरलेल्या शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण सावंत, तालुका प्रमुख तानाजी चौगले, महिला आघाडी जिल्हा संघटक सुषमा चव्हाण, तालुका आघाडी प्रमुख रंजना आंबेकर, के.के.राजीगरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. तहसील कार्यालयावर आल्यावर पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर महिला कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून तहसील कार्यालयात प्रवेश मिळविला. पाठोपाठ कार्यकर्ते कार्यालयात घुसले. मोर्चाची पूर्वकल्पना तहसीलदार रणजित देसाई यांना देण्यात आली होती. मात्र आंदोलकांना तहसीलदार देसाई हे अनुपस्थित असल्याचे समजले. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.