इचलकरंजीतील लालनगर येथील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी)मधून विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जात असल्याचे नागरिकांच्या सतर्कतेमुळे पहाटेच्या सुमारास उघडकीस आले. दरुगधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी सीईटीपीसमोरच रस्त्यावर जलवाहिन्या टाकून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच प्रकल्पाचे कामही बंद पाडले. प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे यांनी यासंदर्भात मार्ग काढण्यासाठी तातडीची बठक घेण्याचे आश्वासन दिले.
लालनगर येथील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रकल्पात शहरातील ६२ प्रोसेसमधील रासायनिक सांडपाणी एकत्र केले जाते. या सांडपाण्यावर सीईटीपी प्रकल्पात प्रक्रिया करून ते पुढे ओढय़ात सोडले जाते. या प्रकल्पातून विनाप्रक्रिया सांडपाणी आहे तसेच सोडले जात असल्याची तक्रार या भागातील नागरिकांकडून केली जात होती. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट ओढय़ात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. याच वेळी या भागातील नागरिकांनी याबाबत नगराध्यक्षांचे पती मुकुंद पोवार यांना बोलावून घेऊन थेट सोडण्यात येत असलेल्या पाण्याचे नमुने घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जात असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. रासायनिक पाण्यामुळे प्रचंड दरुगधी सुटत असल्याने नागरिकांना श्वसनाचे विकार जडू लागल्याचे आरोप केले जात आहेत. यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर आले. सीईटीपी कार्यालयासमोरील सर्वच रस्ते रोखून धरले. माजी पाणीपुरवठा सभापती अब्राहम आवळे, उदय धातुंडे, मनसेचे उपशहरप्रमुख िपटू गळतगे आदींसह भागातील नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडल्याने या मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे हा प्रकल्प बंदच करावा अशी मागणी करत प्रकल्पाचे कामकाजही बंद पाडले.
याबाबतची माहिती मिळताच प्रभारी नगराध्यक्ष संजय कांबळे, नगरसेवक रवि रजपुते आदी घटनास्थळी आले. या वेळी नागरिकांनी त्यांना दूषित पाण्याचे नमुने दाखवत प्रकल्प बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावर संजय कांबळे यांनी चच्रेनंतर सीईटीपीचे पदाधिकारी यांच्यासमवेत तातडीने सर्वसमावेशक बठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.