माढा लोकसभा मतदारसंघ रिपाइंला देण्यात यावा. येथून प्रतापसिंह मोहिते निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यांना पक्ष उमेदवारी देईल, असे सांगत रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी जागावाटपाचा निर्णय १ मार्चपर्यंत घ्यावा, अशी विनंती महायुतीच्या नेत्यांना केल्याचे गुरुवारी येथे सांगितले. सोमवारी (दि. २४) स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.
नगरसेवक सुरेश इभंगळे यांच्या रिपाइं प्रवेश सोहळ्यासाठी आठवले येथे आले होते. त्यापूर्वी पत्रकार बठकीत त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. स्वतंत्र तेलंगण राज्याची घोषणा करून केंद्राने योग्य पाऊल टाकले आहे. याच धर्तीवर स्वतंत्र विदर्भाचीही मागणी मान्य व्हावी, म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. ५३ वर्षांंपूर्वी विदर्भाला दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत. त्यामुळे विदर्भाचा अनुशेष कायम आहे. दोन मराठी भाषिक राज्ये निर्माण झाल्याने विकास होईल, असेही ते म्हणाले. या प्रश्नी जांबुवंतराव धोटे यांच्यासह अन्य पक्षातील नेत्यांशी बोलणी करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघावर रिपाइंचा दावा अधिक आहे. कारण अनेक वष्रे पंढरपूरमधून निवडून आल्याने तेथे विजय मिळविणे रिपाइंला सोपे असल्याचा दावा त्यांनी केला. या जागेसाठी प्रतापसिंग मोहिते यांच्याशी संपर्क झाला आहे. ते रिपाइंकडून उमेदवार होण्यास तयार आहेत. त्यामुळे ही जागा देतानाच लातूरची जागाही मिळावी, अशी मागणी केल्याचेही आठवले म्हणाले.
अण्णा हजारे यांनी आता आम आदमी पक्षाला समर्थन देणे थांबवावे. या पक्षाची हवा संपली आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना समर्थन करायचे असेल, तर समाजवादी व लोहियावादी कार्यकर्त्यांनी आता रिपाइंचा पर्याय स्वीकारावा. मराठा समाजासाठी इतर मागास प्रवर्गाचा वेगळा गट करावा. त्यांना किमान १५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.