शहर महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी मागील ६ महिन्यांचे थकीत वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी लेखणी बंद आंदोलन सुरू केले. आंदोलनामुळे मनपा कार्यालयात शुकशुकाट होता. उद्यापासून (मंगळवार) सफाई कामगार व पाणीपुरवठा योजनेतील कर्मचारी आंदोलनात उतरणार आहेत.
महापालिकेची स्थापना झाल्यानंतर वर्षभरात सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारा निधी बंद झाला. मनपाला स्वउत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे लागते. मनपाकडे सध्या एलबीटी वसुली हाच प्रमुख आधार आहे. परंतु अपेक्षित एलबीटी वसूल होत नसल्याने मनपासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या ६ महिन्यांपासून मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना ५, तर निवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या ९ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. आर्थिक घडी बसविण्यास एलबीटीच्या प्रभावी वसुलीशिवाय पर्याय नाही.
प्रत्येक महिन्यात मनपा कर्मचारी थकीत वेतनासाठी आंदोलन करतात. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अदा केले. त्यांचेही आता ३ महिन्यांचे वेतन थकीत आहे. थकीत वेतनासोबतच मागील दोन वार्षिक वाढीचा फरक मिळावा, संपकाळातील कपात केलेला पगार द्यावा, कर्मचाऱ्यांकडील घरपट्टी, नळपट्टीची रक्कम सहाव्या वेतन आयोगातून कपात करावी, कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला करावेत, या मागण्यांसाठी मनपा कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदालन सुरू केले आहे.