05 June 2020

News Flash

पर्यावरणदिनानिमित्त पंचगंगेतील प्रदूषणाला आंदोलनाची धार

पर्यावरणदिनाचे निमित्त साधत बुधवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये मृत मासे टाकण्याचे आंदोलन स्वाभिमानी युवा आघाडीने, तर कार्यालयात जलपर्णी फेकण्याचे आंदोलन शिवसेनेने केले.

| June 6, 2013 01:56 am

पर्यावरणदिनाचे निमित्त साधत बुधवारी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये मृत मासे टाकण्याचे आंदोलन स्वाभिमानी युवा आघाडीने, तर कार्यालयात जलपर्णी फेकण्याचे आंदोलन शिवसेनेने केले. कार्यालयामध्ये गोंधळ घातल्याच्या कारणावरून युवा आघाडीच्या सहाजणांना अटक करण्यात येऊन नंतर सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे पंचगंगा नदीकडे प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण खात्याचा हलगर्जीपणा चव्हाटय़ावर आला.     
पंचगंगा नदीतील प्रदूषणाची तीव्रता कायम आहे. या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष वेधूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी आणि नदी प्रदूषणाची तीव्रता निदर्शनास आणून देण्यासाठी बुधवारी दोन आंदोलने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात झाली.     
खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीने पंचगंगा नदीतील मासे मृत होण्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ मे रोजी इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले होते. प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे बुधवारी युवा आघाडीच्या सुमारे ५०हून अधिक कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण कार्यालयाच्या दारात मृत मासे नेऊन टाकले. त्याची दरुगधी परिसराच्या कार्यालयात पसरली होती. युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गैरकारभाराच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचे दरवाजे बंद केले.
या प्रकारामुळे युवा आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी दरवाजावर लाथा मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. तसेच शासकीय कार्यालयात गोंधळ घातल्याप्रकरणी युवा आघाडीचे शिरोळ तालुकाध्यक्ष बंडू ऊर्फ बाळगोंड पाटील, जयसिंगपूर शहर कार्यकारिणी सदस्य शैलेश चौगुले, स्वाभिमानीचे जिल्हा सरचिटणीस रमेश भोजकर, संदीप पुजारी, विश्वास बालीघाटे यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, पंचगंगा नदीतील जलपर्णीचे निर्मूलन करण्यात जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपयश आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर आंदोलन केले. पंचगंगा नदीतील जलपर्णीचा ढीग शिवसैनिकांनी सोबत आणला होता. तो या कार्यालयाच्या समोर टाकला. जलपर्णीचे विधिवत पूजा करण्यात आली. त्याचे तोरण करून ते कार्यालयास बांधण्यात आले. निष्क्रिय सत्तारूढ व सुस्त प्रशासनाचा जाहीर निषेध करणारा फलक लावण्यात आला होता. जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसैनिक सहभागी झाले होते.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2013 1:56 am

Web Title: agitation for pollution of panchganga on environment day
Next Stories
1 गांधी जयंतीपर्यंत जनतंत्र जागर अभियान
2 ‘अर्बन’च्या संचालकांवरील वसुलीस स्थगिती
3 पावसाच्या आगमनाबरोबर मशागतीची कामे सुरू
Just Now!
X