शहरातील रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत कर भरणार नाही असा पवित्रा सुमारे दीड हजार नागरिकांनी घेतला. घेतलेल्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला सिटी चौक पोलिसांनी दमदाटी करून बाहेर काढले. त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. श्रीकांत उमरीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी हे आंदोलन केले.
कर न भरण्याच्या निर्णयाबाबत महापालिकेत दुपारी साडेतीन वाजता निवेदन दिले जाईल, अशी पूर्वसूचना महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना दिली होती. पावणेतीनपासून हे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ आयुक्तांच्या दारात बसले होते. ते आलेच नाहीत. त्यांच्या स्वीय सहायकांकडे आयुक्त केव्हा येणार, अशी विचारणा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केली. पाचच्या सुमारास आयुक्त दालनात आले. तेव्हा निवेदन स्वीकारण्यास दिलेली वेळ पाळली नाही, त्यामुळे आयुक्तांनी दालनाबाहेर येऊन निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका श्रीकांत उमरीकर, दत्ता जोशी, अॅड. महेश भोसले, संकेत कुलकर्णी, गजानन सानप, राम बुधवंत, सी. ई. पाठक, एस. एन. पानट, अॅड. अंजली कुलकर्णी आदींनी घेतली.
दरम्यान, सिटी चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय सोनवणे यांनी आंदोलकांना दमबाजी केली. छायाचित्रकारांना उद्देशून ‘तुम्ही कोणत्याही माणसाला मोठे करता’, तसेच आंदोलकांनाही म्हणाले, ‘मला खेटू नका. मी बसल्या बसल्या संपवू शकतो,’ असेही वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे आंदोलक चिडले. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकांसह आंदोलकांना ताब्यात घेतले. सिटी चौक पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले. नंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमारे दीड हजार नागरिकांनी रस्ते दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत कर न भरण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन चालूच राहील, असे उमरीकर यांनी स्पष्ट केले.