सलग दोन महिन्यांपासून इगतपुरी शहरात अस्वच्छ आणि गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शेकडो महिला व नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. या वेळी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत मोर्चेकऱ्यांनी धारेवर धरले. या घडामोडींमुळे नगरपालिका कार्यालयात एकच गदारोळ उडाला. मोर्चेकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
इगतपुरी शहराच्या ३० हजार लोकसंख्येला नगरपालिकेच्या तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तलावाजवळील शुद्धीकरण केंद्राची यंत्रणा नादुरुस्त असल्याने दोन महिन्यांपासून अस्वच्छ, गढूळ मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. नळाद्वारे येणारे हे पाणी नागरिकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेऊन दाखविले. परंतु, संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या कारणावरून धुमसणाऱ्या असंतोषाचे पडसाद गुरुवारी आंदोलनाच्या स्वरूपात उमटले. बजरंग वाडा, आनंदनगर, बारा बंगला, महात्मा गांधी नगर, पटेल चौक, रमाबाई कॉलनी, धोबी गल्ली, आदी भागांतून नागरिक जमा झाले. त्यात महिलांची संख्या मोठी होती. भाजयुमोचे माजी प्रदेश सचिव महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मोर्चा काढला. नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यालयात प्रवेश करून महिलांनी मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांना घेराव घातला.
दूषित पाणी पाजणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी अशी मागणी करण्यात आली. मागील काही दिवसांपासून नगरपालिका तलावात अज्ञात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडला होता. शुद्धीकरण न करता शहराला पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यातून अतिशय दरुगधी येत असून अधिकारी त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप महिलांनी केला. जवळपास दीड ते दोन तास मोर्चेकऱ्यांनी नगरपालिका कार्यालयात ठिय्या दिला. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. मुख्याधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. दूषित पाण्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दूषित पाण्याबद्दल तक्रार करण्यास गेलेल्यांना कर्मचारी पाणी शुद्धीकरण यंत्र बसवून घेण्याचा सल्ला देतात. अस्वच्छ पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांनी थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मोर्चेकरी ऐकत नसल्याने प्रशासनाने पोलिसांना पाचारण करत आपली सुटका करून घेतली.