राज्य शासनाने कोल्हापुरात टोल वसुलीच्या हालचाली सुरू केल्या असताना शहरातील नागरिकांनी याविरुद्ध पुन्हा आंदोलनाला हात घातला असून बुधवारी शासनाच्या मुख्य सचिवाच्या प्रतीकात्मक पुतळ्यास चप्पलमार आंदोलन केले. आंदोलनाची सुरुवात खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केली. १२-१२-१२ तारखेचा मुहूर्त साधत केलेल्या आंदोलनावेळी आता टोलचे वाजवू या १२ असा संकल्प या वेळी सर्व पक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आला.    
कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीच्या वतीने २२० कोटी रुपये खर्च करून रस्ता प्रकल्प बनविण्यात आला आहे. याकरिता टोल आकारणी करण्याचे शासनाने ठरविले असले, तरी नागरिकांचा त्यास विरोध आहे. सर्व पक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने गेली दोन वर्षे जनआंदोलन सुरू आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक होत आहे, ही माहिती मिळाल्यानंतर कृती समितीने नव्याने आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी कृती समितीचे कार्यकर्ते व नागरिक शिवाजी चौकात जमले. तेथे टोलविरोधी घोषणा देण्यात आल्या. टोल वसुलीसाठी प्रयत्नशील असणारे शासनाचे मुख्य सचिव जयंत बांटिया यांचा प्रतीकात्मक पुतळा बनविण्यात आला. अधिकाऱ्याच्या वेशातील हा पुतळा खुर्चीवर बसविण्यात आला. प्रतीकात्मक पुतळ्यास चप्पलमार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी चार फूट लांबीचे खास कोल्हापूर चप्पल बनविण्यात आले होते. हे चप्पल लक्षवेधी ठरले. खासदार मंडलिक यांनी आंदोलनाची सुरुवात केली. टोल विरोधातील फलक घेऊन तसेच टोप्या परिधान करून कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.     
आंदोलनात कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष महेश जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अॅड.पंडितराव सडोलीकर, बाबा इंदूलकर, अशोक पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सुभाष देसाई, भारती पोवार, दीपा पाटील, वैशाली महाडिक यांच्यासह नागरिकांचा समावेश होता.