महाराष्ट्रात अपंगांची अवस्था अत्यंत वाईट असून राज्यभर दौरा करून या वस्तुस्थितीचा आपण आढावा घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर शेतकरी व अपंगांना शासनाने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी दोन ऑक्टोबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर प्रहार अपंग आंदोलन संघटनेच्या वतीनेठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक आ. बच्चू कडू यांनी येथे दिली.
संघटनेच्या स्थानिक शाखेतर्फे येथे नाशिक जिल्हा अपंग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. अपंगांच्या विविध राज्यव्यापी समस्यांचा ऊहापोह करून त्यातील समस्यांसाठी लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
अपंगांचे मानधन वाढवावे, झोपडपट्टीधारकांना घरे देताना त्यात अपंगांना प्राधान्य द्यावे, सरसकट सर्व अपंगांना विनाअट घरकुल देण्याकरिता इंदिरा आवास योजना अथवा सामाजिक न्याय विभागामार्फत नवीन योजना आखावी, एसटी महामंडळाच्या बस स्थानकावरील स्टॉल अपंगांना विनाअट देण्यात यावे या प्रमुख मागण्या आहेत. मानधनवाढीसाठी आमदारांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वेतनातून काही रक्कम कपात करण्याची मागणी करण्यात आली. संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षा संध्या जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ गोकुळअष्टमे, सोमनाथ जाधव, मच्छिंद्र उराडे, चंद्रभान गांगुर्डे, संतोष सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.
मनमाडसारख्या ठिकाणी अपंगांची १८४ प्रकरणे प्रलंबित आहेत. पंकज भुजबळ आमदार असताना असे होणे ही लाजिरवाणी बाब आहे. कित्येक वर्षे अपंगांची प्रकरणे मंजूर होत नाहीत हे आश्चर्यकारक आहे, असे सांगत मेळाव्यास उपस्थित दोन हजार अपंगांच्या समस्या कडू यांनी समजावून घेतल्या.