पूर्णपणे उखडलेल्या जालना-सिंदखेडराजा रस्त्यावरील पथकर वसुली बंद करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने करण्यात आली. माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, आमदार संतोष सांबरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हा रस्ता अतिशय खराब असूनही पथकर वसुली करून वाहनचालकांची लुबाडणूक करणे थांबवावे. सामान्य जनता व शेतकऱ्यांची अडवणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारकडून चालू आहे, असे सांगतानाच जालना शहराची बकाल अवस्था करणाऱ्यांना येथील जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खोतकर यांनी या वेळी दिला. अंबेकर म्हणाले, की चांगल्या रस्त्यासाठी पथकराच्या स्वरूपात नागरिकांनी पैसे द्यावेत. परंतु रस्तेच खराब असतील तर पथकर का द्यायचा? जालना-सिंदखेडराजा रस्त्याची खराब असताना पथकर नाका उभारून वसुली करणे गैर आहे. शहरातील रस्त्यांची अवस्थाही वाईट असून नागरिकांना मणक्यांचे व अन्य आजार बळावत चालले आहेत. रिक्षाचालकही वैतागले आहेत. ग्रामीण भागातील वीजपुरवठा १८-१८ तास खंडित होत असला, तरी वीज कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शेतकरी वीज कंपनी कार्यालयात चकरा मारून थकतात. परंतु रोहित्रे दुरुस्त करून दिली जात नाहीत. लोकप्रतिनिधीही जनतेच्या प्रश्नावर तोंड उघडत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
जालना-सिंदखेडराजा रस्त्यावरील पथकर वसुली गैर असली, तरी या भागातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी ही नियमबाहय़ वसुली कशी काय होऊ देतात, हा प्रश्न आहे असे सांगून आमदार सांबरे यांनी आपल्या भागातील पथकर वसुली रस्ता खराब असल्यामुळे आपण बंद करावयास लावली, याकडे लक्ष वेधले. जि.प.चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर म्हणाले, की आपले प्रश्न सोडविण्याची क्षमता असणारे लोकप्रतिनिधीच जनतेने निवडून द्यावेत. ही क्षमता शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमध्येच आहे. शिवसेना शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, पंडितराव भुतेकर आदींची उपस्थिती होती.