हुडकेश्वर- चिकना रस्ता नव्याने बांधावा तसेच अवजड ट्रक वाहतूक थांबवावी, या मागणीसाठी मंगळवारी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी चिकना फाटय़ावर धरणे आंदोलन केले.
पाचगाव येथे गिट्टी, दगड व मुरुमांच्या खाणी आहेत. येथून क्षमतेपेक्षा जास्त माल भरून ट्रक विविध भागात जातात. दहा टन वजनाची मर्यादा असतानाही चाळीस टन माल भरला जातो. हे ट्रक विविध ठिकाणी जातात. त्यामुळे जिल्हा मार्ग उद्ध्वस्त झाले आहेत. जिल्हा मार्गावरील जकात व टोल कर वाचविण्यासाठी ट्रक बिडीपेठ, हुडकेश्वर, चिकना, सालई, मटकाझरी या रस्त्याने जात आहेत. त्यामुळे हा रस्ता उद्ध्वस्त झाला असून मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात रोजचेच झाले आहेत. रस्ताच उखडल्यामुळे धूळ उडत असल्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नियमबाह्य़ वाहतूक सुरू असूनही प्रशासन त्यावर कुठलीच कारवाई करीत नाही. त्यामुळे अवजड ट्रक वाहतूक थांबवावी व हे रस्ते तातडीने नव्याने तयार करावे, या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा भाजपने दिला होता.
आज सकाळपासून भाजपचे कार्यकर्ते चिकना फाटय़ावर जमले होते. आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व ग्रामीण परिवहन अधिकारी विजय जिचकार यांच्याशी चर्चा करून आमदार बावनकुळे यांनी नागरिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. महसूल, राजस्व, पोलीस, जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते, खनिकर्म विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन बिडीपेठ, हुडकेश्वर, चिकना, मटकाझरी या मार्गावरील ओव्हरलोड वाहतूक तातडीने बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, आजच्या आंदोलनाचा धसका घेत या मार्गाने ट्रक वाहतूकच झाली नाही. प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध देशपांडे, मोटार वाहन निरीक्षक प्रवीण महल्ले पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कमेश कंतेवार, कुहीचे पोलीस निरीक्षक अजय मालवीय, नायब तहसीलदार गुलाब खैरकर यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. आठ दिवसात त्यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने, पंचायत समिती सदस्य मंजूषा भांबुलकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.