टोल आकारणीच्या विरोधात सोमवारी निघणाऱ्या मोर्चाची तयारी झाली आहे. जिल्हातील १२ तालुक्यातील शहरातील सर्व पेठा, तालीम मंडळे, तरुण मंडळे, महिला संघटना यांचा मोर्चामध्ये सहभाग असणार आहे. मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहता मोर्चा अभूतपूर्व निघेल असा विश्वास टोल विरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केला. यावेळी रामभाऊ चव्हाण, बाबा इंदूलकर, बाबा पारटे, महेश जाधव आदी उपस्थित होते.
साळोखे म्हणाले, टोल विरोधातील लढय़ामध्ये करवीरची जनता एकजुटीने सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील जनताही या मोर्चात मोठय़ा प्रमाणात सहभागी होणार आहे. मोर्चा मोठा असला तरी तो सनदशीर मार्गाने निघणार असून कायदा सुवेस्थेला कोणतीही बाधा पोहचणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाणार आहे. मोर्चाची सुरुवात गांधी मदान येथून होणार असून तो पुढे खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, महापालिका, शिवाजी चौक, िबदू चौक, दसरा चौक, राजाराम महाराज पुतळा, बसंत-बहार चित्र मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा राहणार आहे.
दरम्यान टोल विरोधातील आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने सोमवारच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ज्ञानी बांधवाना केले आहे. महासंघाचे प्रदेश अध्यक्ष शामराव जोशी, जिल्हाध्यक्ष श्रीपाद मराठे यांनी या आशयाचे पत्रक प्रसिध्द केले आहे. टोल वसुलीच्या सोमवारच्या आंदोलनामध्ये मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर, कादर मलबारी, शौकत मुजावर यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी टोलला विरोध करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान जयसिंगपूर येथे टोल विरोधात पाच गावांमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. १५ जुलै रोजी जयसिंगपूर, २० जुलै रोजी कुरुंदवाड, २५ जुलै रोजी दत्तवाड, २ ऑगस्ट रोजी कवठेगुलंद व ९ ऑगस्ट रोजी शिरोळ येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेवेळी टोलविरोधी ठराव संमत करण्यासाठी ठरावाचा नमुना पाठविण्यात येणार आहे हे आंदोलन एआययूएफ या संघटनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सचिव शिवाजी माळी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शिवसेनेच्या वतीने टोल विरोधी आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. टोलरूपी राक्षस गाडण्यासाठी सोमवारच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा शहर प्रमुख संजय पोवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, विजय कुलकर्णी आदींनी केले.