गेले ७६ दिवस कामबंद आंदोलन करणाऱ्या प्राध्यापकांच्या निवासस्थानी ढोल-ताशे वाजवित विद्यार्थी संघर्ष समितीने शुक्रवारी प्राध्यापकांना जागे करणारे आंदोलन केले. तर, पालकांनी प्राध्यापकांची आरती करीत जागे होण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला झळाळी प्राप्त झाली. त्यांनी प्राध्यापकांना कडक शब्दात सुनावले.
प्राध्यापकांच्या राज्यस्तरीय परीक्षा बहिष्काराच्या निषेधार्थ आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय  संयुक्त विद्यार्थी संघटना संघर्ष समितीने रविवारी घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी संघर्ष समितीचे पदाधिकारी, विद्यार्थी व पालकांनी प्राध्यापकांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. प्रातिनिधिक स्वरूपात सुटाचे जिल्हा सहकार्यवाह प्रा.रघुनाथ ढमकले यांच्या निवासस्थानी ढोल-ताशे वाजविण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्राध्यापक ढमकले यांना हात जोडून आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले.
शासन व प्राध्यापकांचे भांडण असतांना विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार प्राध्यापकांना नाही, अशा शब्दात एन.डी.पाटील यांनी प्राध्यापक ढमकले यांना सुनावले. भाजयुमोचे प्रशांत जरग, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अवधूत अपराध, एनएसयूआयचे भारत घोडके, मनविसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित  राऊत यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. गायत्री निंबाळकर व वैशाली पाडेकर या पालकांनी प्रा.ढमकले यांना ओवाळून उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. आंदोलनात रोहित पाटील, अक्षय
नायकवडी, नीलेश यादव, राज सोरटे, मल्लीनाथ साखरे, अमित वैद्य, दिग्विजय पाटील, अमृत लोहार, उत्तम  बामणे, मंदार पाटील आदी सहभागी झाले होते.