यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीसाठी उद्या शनिवारी रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत करण्यात आली. तर दुसरीकडे यंत्रमागधारकांच्या संघटनांमध्ये मजुरीवाढीवरून फूट पडली आहे. शहरात काही प्रमाणात यंत्रमाग कारखाने सुरू झाले असलेतरी अजूनही बरेचसे कारखाने बंद आहेत.     
यंत्रमाग कामगारांनी मजुरीवाढीसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा २६वा दिवस होता. सायंकाळी नारायणराव घोरपडे चौकात झालेल्या जाहीर सभेत कॉ. दत्ता माने यांनी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शनिवारी शाहू पुतळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर कामगार स्वत:ला अटक करून घेतील, अशी घोषणा त्यांनी केली. सभेत मिश्रीलाल जाजू, राजेंद्र निकम, भरमा कांबळे, मदन मुरगुडे, हणमंत लोहार, सचिन खोंद्र, शिवानंद पाटील यांची भाषणे झाली.    
दरम्यान, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दोन्ही पोलीस ठाण्यांतील निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. यंत्रमागधारक कामगारांना कामावर येण्यासाठी दमदाटी, मारहाण करत आहेत. सनदशीर मार्गाने झालेले हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा यंत्रमागधारकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.     दरम्यान, यंत्रमागधारकांच्या चार संघटनांचा मेळावा तांबे मळय़ात झाला. कोल्हापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष दीपक राशीनकर, राष्ट्रवादी पॉवर लूम संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ मेटे, यंत्रमाग जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलिन यंत्रमागधारक संघटनेचे अध्यक्ष सचिन हुक्किरे यांनी संयुक्तरीत्या यंत्रमाग कामगारांना ७६ पैसे मजुरी व १६.६६ टक्के बोनस देण्याची घोषणा केली. तर या निर्णयापासून इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी व त्यांचे सहकारी दूर राहिले. त्यांचे नेते माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कामगारांना किमान ८२ पैसे मजुरी द्यावी, असा प्रस्ताव मांडला होता. यामुळे यंत्रमागधारकांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.