लोणार तालुक्यातील वाळू घाटातून नियमबाह्य़ जास्त वाळूचे उत्खनन करून लाखो रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या वाळू माफियांवर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच अवैधरित्या वाळू माफियांनी साठवून ठेवलेली शेकडो ब्रास वाळू जप्त करण्यात यावी, अन्यथा तालुका सनियंत्रण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समितीचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी यांनी दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीच महसूल विभागाकडून तालुक्यातील वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला होता. परंतु, वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने लिलाव झालेल्या वाळू घाटातून नियमबाह्य़ वाळूचे उत्खनन करून लाखो रुपयांची माया जमा केली आहे. परिणामी, शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागला आहे.
वाळू माफियांकडे गतवर्षीचा जवळपास २० लाख रुपये दंड आणि यावर्षीचे ४० लाख रुपये असा एकूण ६० लाख रुपयांचा दंड वसूल करणे बाकी आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसात या वाळू माफियांनी परिसरातील वाळू घाटात मोठमोठे खड्डे पाडून त्यातून मोठय़ा प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा केला आहे. त्यामुळे नदीत पाण्याचे सिंचन न होता ते सरळ वाहून जात आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
यावरही कळस म्हणून वाळू माफिया अवैधरित्या घाटातील वाळूचे उत्खनन करताना महसूल विभाग कुठलीच कारवाई करीत नाही. त्यामुळे या वाळू तस्करीला त्यांचे अभय असल्याचे स्पष्ट होत आहे.
पावसाळ्यात वाळूला जास्त भाव मिळतो म्हणून अनेक वाळू माफियांनी लोणार शहरात ठिकठिकाणी हजारो ब्रास वाळूचे साठे करून ठेवले आहेत. हीच वाळू पावसाळ्यात अव्वाच्या सव्वा भावाने विकून घरमालकांना लुबाडणार आहेत.
त्यामुळे अवैधरित्या साठवलेली वाळू शासन जमा करून वाळू माफियांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश मापारी यांनी दिला आहे.