स्थानिक स्वराज्य करासंदर्भात गेल्या एक महिन्यापासून पुकारलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेत एलबीटीच्या संदर्भात कुठलाच तोडगा निघाला नसल्याने  व्यापारांनी आणखी तीव्र तीव्र करण्याचा इशारा देत खासदार विलास मुत्तेमवार यांच्या धंतोलीतील कार्यालयासमोर  निदर्शने करून त्यांना घेराव घातला. यावेळी एलबीटीच्या संदर्भात भूमिका स्पष्ट करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मुत्तेमवार यांनी दिले. दरम्यान शहरातील बडकस चौक आणि जागनाथ बुधवारी भागातील दुकानांवर व्यापारांच्या जमावाने दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.
व्यापारांच्या आंदोलनाला एक महिना होत असताना मुख्यमंत्री एलबीटीच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार विलास मुत्तेमवार यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडत यापूर्वी मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. सोनिया गांधी यांच्याशी राज्यातील खासदारांनी चर्चा करून त्यांना निवेदन दिले मात्र त्यानंतरही व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला जात नाही. मुत्तेमवार यांनी व्यापारांच्या आंदोलना संदर्भात भूमिका स्पष्ट केली असली तरी केंद्र आणि राज्य पातळीवर पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून या एलबीटी संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करीत एलबीटी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री आणि नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मुत्तेमवार यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मुत्तेमवार यांनी व्यापारांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगून लवकरच सोनिया गांधी यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा करण्याचे आश्वासन व्यापारांना दिले.
दरम्यान शहरातील इतवारी, गांधीबाग, धान्य बाजार, सराफा ओळ, गोकुळपेठ, सक्करदरा, सदर, नंदनवन, शंकरनगर, महाल, केळीबाग रोड, मानेवाडा या भागातील व्यापारी प्रतिष्ठाने कमी अधिक प्रमाणात बंद होती. शहीद चौकातून व्यापारांनी स्कूटर रॅली काढून हंसापुरी, बडकस चौक, महाल, केळीबाग, चिटणीस पार्क, नंदनवन, सक्करदरा या भागातील दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. बडकस चौकात दुकाने सुरू असल्यामुळे दुकानांवर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापारांच्या दोन गटामध्ये झालेल्या भांडणामुळे पटापट दुकाने बंद करण्यात आली. अनेकांनी दुकानाची काचे फोडल्यामुळे वातावरण तापले होते. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा बडकस चौकात पोहचला. यावेळी व्यापारांवर सौम्य लाठीमार करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांना आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यापारांना सोडण्यात यावे अशी मागणी करीत दुपारनंतर व्यापाऱ्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण होते.
एलबीटी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश मंत्री म्हणाले, व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना होत आला तरी मुख्यमंत्री काहीच तोडगा काढत नाही. सरकारने समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती मात्र त्यात व्यापारांचा समावेश करण्यात आला नाही. मुंबई, ठाणे, कल्याण-डोबिवली, पुणे, नाशिक या भागातील व्यापारी संघटनांना चुकीच्या पद्धतीने माहिती देत असून त्यांची दिशाभूल करीत आहे. महाराष्ट्रातील व्यापारी संघटनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्याकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. व्यापाराची संघटना असलेल्या ‘फॅम’ व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक झाली असून जो पर्यंत एलबीटी रद्द करीत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील व्यापारी संघटनाची राज्य सरकारकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांमध्ये भांडणे न लावता एलबीटी रद्द करावा अन्यथा आंदोलन सुरू राहणार आहे. पोलिसांकडून व्यापारांच्या आंदोलन दरडपण्याचा प्रयत्न सुरू असून व्यापारांना मारहाण केली जात असल्याचा चेंबरने निषेध केला. यावेळी व्हीआयएचे अध्यक्ष प्रफुल्लभाई दोषी, मुरलीधर सुरजन, राधेश्याम सारडा, नीलेश सूचक, अजय मदान, हेमंत गांधी उपस्थित होते.