कराड नगरपालिकेची २४ तास नळपाणीपुरवठा योजना कार्यक्षमपणे व काटकसरीने चालवण्याच्या दृष्टीने जपानचे शिष्टमंडळ व कराड पालिकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. पालिकेतर्फे नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे यांनी करारावर स्वाक्षरी केली. पाणीपुरवठा सभापती हणमंत पवार, बांधकाम सभापती सुहास पवार उपस्थित होते. या करारासाठी आनंद वाचासुंदर यांचे सहकार्य मिळाले. योगेश्वरी हर्डीकर यांनी दुभाषीचे काम केले.
पुणे येथे जानेवारीमध्ये झालेल्या भारतीय जलशुद्धीकरण केंद्र संघटनेच्या अधिवेशनासाठी आलेल्या जपान येथील जलशुद्धीकरण संघटनेच्या शिष्टमंडळाने कराड नगरपरिषदेस भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी पालिकेच्या पाणीयोजना कार्यक्षमपणे राबवण्यासंदर्भात सहकार्य करून करआकारणी न होणारे पाणी कमी करण्याच्या दृष्टीने काम करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार २९ जुलै ते ७ ऑगस्टपासून जपानचे सात जणांचे शिष्टमंडळ येथे आले होते. त्यांनी पाणी योजनेच्या विविध भागांना भेट देऊन माहिती घेतली. त्यातून त्रुटींचा अभ्यास केला. शिष्टमंडळाला आवश्यक माहिती उपअभियंता सुहास इनामदार, ए. आर. पवार, आर. डी. भालदार यांनी दिली. त्यानुसार अभ्यास करून २४ तास पाणी योजनेत सुधारणा सुचवण्यात आल्या. त्यात प्रस्तावित योजनेत अधिक कार्यक्षम व टिकाऊ स्लुईस, गट व्हॉल्व्ह, नॉन रिटर्न व्हॉल्व्ह व एअर व्हॉल्व्हचा वापर करणे, खासगी नळजोडण्यांसाठी कार्यक्षम व नामांकित कंपनीचे जलमापक उपलब्ध करून जोडणे, रुक्मिणीनगर झोनमध्ये पाणीगळती दूर करण्यासाठी आधुनिक उपकरणांच्या माध्यमातून पाहणी करणे आवश्यक ठिकाणी मल्टिपर्पज टी आकाराच्या पाइप तयार करणे व प्रत्यक्ष जागेवर जपानी तंत्रज्ञान वापराची माहिती घेणे, तसेच जपानमधील तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण करणे आदी बाबींचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत त्यावर चर्चा होऊन अशाप्रकारे सेवा देण्याचे जपानी शिष्टमंडळाने मान्य केले. त्या सेवा स्वीकारण्यासाठी पालिकेने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी पालिका व जपानी शिष्टमंडळात सामंजस्य करार करण्यात आला.