सध्या निवडणुकांचा हंगाम आहे. योगायोगाने याच काळात आगरी आणि कोळी बांधवांच्या गावोगावच्या जत्रांचाही हंगाम आहे. जत्रा म्हटल्यावर खाणे, पिणे, मजा-मस्ती आलेच. हे दोन योग जुळून आल्याने जत्रेत सहभागी होणारे आणि राजकीय कार्यकर्ते अशा दोघांचीही चांगलीच सोय झाली आहे. चैत्र सप्तमीपासून सुरू झालेल्या या जत्रांच्या निमित्ताने मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यांमध्ये दारूपासून मांसाहारापर्यंत सगळे काही पुरविण्याची जणू चढाओढच लागली आहे. यातील ‘पुरवठादार’ कोण आणि ‘लाभार्थी’ कोण हे सुज्ञांस सांगणे नलगे!
प्रचाराच्या रणधुमाळीत समाजाला भेटण्यासाठी जत्रा हे खूपच सोयीचे साधन बनले आहे. त्यामुळेच गावागावात मद्यापासून मांसाहरापर्यंत काहीही पुरविण्याची चढाओढ राजकीय पक्षांमध्ये सुरू झाली आहे. काळाबरोबर बदललेल्या नवी मुंबईत हे प्रमाण कमी असले तरी रायगड जिल्ह्य़ात १७ एप्रिल रोजी होणाऱ्या महाजत्रांवर सर्वच पक्षांचे लक्ष असणार आहे.
आगरी कोळी समाजाच्या या जत्रा टप्याटप्याने सुरू झालेल्या आहेत. चैत्र पालवीची चाहुल लागल्यानंतर भानुसप्तमीपासून १० दिवस पोर्णिमेपर्यंत या जत्राची लगबग सुरू राहणार आहे. आगरी कोळी बांधवांची कुलदेवी असणाऱ्या कल्र्याच्या एकवीरा देवीची जत्रादेखील चैत्र सप्तमीपासून सुरू होते. नवी मुंबईतील जत्रा सुरू करण्याचा पहिला मान करावे गावाला देण्यात आला आहे. त्यामुळे ६ एप्रिल रोजी या गावाची जत्रा झाली. त्याच्या एक दिवस अगोदर होणारा जागरणाचा कार्यक्रम हल्लीच सुरू झाला असून त्याला ग्रामस्थांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. यापूर्वी याच गावात जागरणाच्या निमित्ताने संगीत सौभ्रद, संगीत भावबंधन, संगीत संशयकल्लोल, संगीत कीचकवध यासारखी नाटके होत असत, असे ग्रामस्थ आणि नाटककार गजानन म्हात्रे यांनी सांगितले. करावे गावातील जत्रेनंतर नेरुळ, वाशी, दिवाळे, ऐरोली, दिवा अशा गावांत टप्याटप्याने या जत्रा सुरू आहेत. त्यामुळे घरे पै पाहुण्यांनी भरल्याचे दृश्य दिसून येत आहे.
गावातील पाटील, म्हात्रे, तांडेल, मढवी ही भावकी, नातेवाईक, मित्र मंडळी एकत्र येत असल्याने त्याचा फायदा यावेळी राजकीय पक्ष उठवत आहेत. प्रत्येक गावातील ग्रामदेवस्थान, महिला भजनी मंडळ, आणि ग्रामस्थांची देणगी स्वरूपात ‘शांत’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगरी कोळ्याच्या जत्रा म्हणजे मद्य आणि मांसाहार अनिवार्यच असते. त्यांच्या अनेक देवांना मांस-मद्याचा नैवेद दाखविला जातो. स्वाभाविकच गावात मद्याचा साठा पाठविण्याची ‘व्यवस्था’ केली जात आहे. तर मांसाहारासाठी बकरे व कोंबडय़ांचीही दररोज हजारोने कत्तल होत आहे. रायगड जिल्याच्या ग्रामीण भागात तर डुक्कर, ससा, मोर अशी ‘दावत’ देण्याचीही तयारी करण्यात आली आहे. रायगडमधील हजारो गावांमध्ये १७ एप्रिल रोजी होणाऱ्या जत्रा यंदा ‘महाजत्रा’ ठरणार आहेत. त्यासाठी ग्रामस्थ ‘मागतील ते’ देण्याची तयारी उमेदवारांनी ठेवली आहे. यात ‘जलसिंचना’चा पैसा रायगडमध्ये चांगल्यापैकी ‘मुरवले’ल्या एका उमेदवाराने तर प्रत्येक गावात मद्याचे टेम्पो पाठविण्याची व्यवस्था केली आहे. रायगड जिल्हयात न्हावे गावाची जत्रा प्रसिध्द आहे. या जत्रेत गावासाठी जाहीरपणे देणग्या देऊन एकगठ्ठा मतांची तजवीज केली जात आहे. या जत्रा सुरू होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर खंडोबाचे दर्शन घेण्याची परंपरा आगरी कोळी समाजात आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील उमेदवारांकडून केली गेली होती. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्य़ातील या जत्रा दहा दिवसात करोडो रुपयांच्या घरात जास्त असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.