नवी मुंबई शहर हे आगरी-कोळी वस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची सांस्कृतिक ओळख यापुढेही जतन व्हावी यासाठी पालिकेचे अखिल आगरी-कोळी महोत्सवात आर्थिक सहकार्य देण्यावरून शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चांगलेच वादंग झाले. अखेर चर्चेच्याअंती आगरी कोळी महोत्सवाला पाच लाख रुपयांचे आर्थिक सहकार्य देण्यावर शिक्कामोर्तब झाले.
आगरी-कोळी बांधव हे नवी मुंबईतील मूळचे रहिवासी असून नवी मुंबईचा सर्वागीण विकासात त्यांचा मोठा हातभार आहे. त्या अनुषंगाने नेरुळ येथील मैदानामध्ये अखिल आगरी-कोळी संस्थेच्या माध्यमांतून आगरी-कोळी महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवी मुंबईच्या या परंपेरची ओळख व्हावी यासाठी १० दिवस होणाऱ्या या कार्यक्रमाला आर्थिक सहकार्य देण्याच्या मागणीवर नगरसेवकांची चांगलीच राजकीय चर्चा रंगली. नगरसेवक शिवराम पाटील, सूरज पाटील, एम. के. मढवी यांनी चर्चेतून अनेक वादंग निर्माण करत यांवर पर्याय काढला. तर स्थायी समितीचे सभापती कुलकर्णी यांनी प्रशासकीय चर्चा करत पाच लाख रुपयांचा निधी महापालिकेकडून देण्याच्या प्रस्तावावर मंजुरी दिली. त्यामुळे आता नवी मुंबईमध्ये होणाऱ्या आगरी-कोळी महोत्सवात नवी मुंबई महानगरपालिकेची बॅनरबाजी पाहावयास मिळणार आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्येदेखील या प्रस्तावाला मंजुरी मिळवल्यावरून आगामी दिवसांत चांगलीच श्रेयाची फटकेबाजी होणार आहे.