ठाणे जिल्ह्य़ात बहुसंख्येने असणाऱ्या आगरी समाजाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला अकरावा अखिल भारतीय आगरी महोत्सव ४ ते ११ डिसेंबर दरम्यान संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, डोंबिवली पूर्व येथे रंगणार आहे. आगरी युथ फोरमचे आयोजन असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन सोहळा बुधवारी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते व माजी खासदार रामशेठ ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पद्मश्री नेत्रतज्ञ तात्यासाहेब लहाने, जेष्ठ पत्रकार उदय निरगुडकर उपस्थित राहणार आहेत. दै. लोकसत्ता या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.
जगभर विखुरलेल्या या समाजाच्या ज्ञान, कला-कौशल्य आणि बुध्दिमत्तेचा वापर येथील बांधवांना होण्यासाठी आगरी युथ फोरम प्रयत्नशील आहे. या महोत्सवामध्ये या सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. हा संपूर्ण महोत्सवांची रचना अत्यंत पारंपारिक तितकीच कल्पक करण्यात आली आहे. या महोत्सवामध्ये प्रवेश केल्यानंतर पारंपारिक परंतु तितक्याच प्रगत गावामध्ये प्रवेश केल्याचा अनुभव रसिकांना देण्यात येणार आहे. मान्यवर व्यक्तींची रांगोळीचित्रे, ग्रंथ पदर्शन त्यातही आगरी संस्कृतीची ओळख करुन देणाऱ्या पुस्तकांचे स्वतंत्र दालन, सुक्या मासळीचा बाजार, इलेक्टॉनिक्स वस्तू, गृहपयोगी वस्तू,  मुलांच्या मनोरंजनाचे खेळणी येथे उपलब्ध असणार आहेत. महोत्सव सामाजिक सोहळ्याइतकाच लोकरंजनासाठीही ओळखला जातो. त्यामुळे पारंपारिक लोककलांचा मेळावा येथे भरणार आहे. ‘जुळून येती रेशीम गाठी’, ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील कलावंत यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच टाईमपास  चित्रपटातील कलावंत या महोत्सवात सहभागी होणार आहे.
दिग्ग्जांच्या भेटीची संधीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार असून त्यामध्ये लोकबिरादरीचे संस्थापक मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. मंदाकिनी आणि डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकट मुलाखत होणार आहे. नेत्रतज्ञ व पद्मश्री तात्यासाहेब लहाने, पानिपतकार लेखक विश्वास पाटील या सर्वाशी मुलाखतकार रविप्रकाश कुलकर्णी सुसंवाद साधणार आहेत. तर महिला जागृतीसाठी कार्यरत असणाऱ्या भारतीय स्त्रीशक्ती या सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा नयना सहस्त्रबुध्दे यांच्याशी लेखिका माधवी घारपुरे संवाद साधतील. अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे आर्थिक नियोजन, दिलीप भनगडे यांचे सुजाण पालकत्व, मतदानाचे महत्व या विषयावर दशरथ पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी दिली.