ठाणे, रायगड, नाशिक आणि मुंबई परिसरातील नागरिकांची एक महाजत्रा म्हणून ओळखला जाणारा आगरी महोत्सव येत्या २ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत डोंबिवली येथे भरणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आगरी युथ फोरमचे अध्यक्ष व संयोजक गुलाब वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आगरी समाज संस्कृतीची ओळख नव्या पिढीला व्हावी, समाजातील हुंडा व इतर अनिष्ट प्रथा बंद व्हाव्यात, आगरी महोत्सव व्यासपीठाच्या माध्यमातून विधायक कार्याचे संकल्प सुटावेत या उद्देशातून गेल्या दहा वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात विविध स्टॉल्स ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये वस्तूंच्या विक्रीचे,  सेवांची माहिती देणारे स्टॉल्स असतील. यामध्ये शेतीविषयक तंत्रज्ञान, बी बियाणे, सुक्या मासळीचा बाजार, वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, गृहपयोगी वस्तू, पुस्तके, खेळणी, पाळणे, आनंदमेळा आदी संबंधातील सुमारे १३० स्टॉल्स  आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध विषयावरची चर्चासत्रांचे आयोजनही ही महोत्सवात होणार आहे.
डोंबिवली परिसरातील दीड लाख विद्यार्थ्यांना या महोत्सवाचे मोफत प्रवेश पास देण्यात येणार आहेत. या महोत्सवाच्या शुभारंभाला पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावीत, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपसभापती वसंत डावखरे, ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर, महापौर वैजयंती गुजर उपस्थित राहणार आहेत.