जिल्ह्य़ात या वर्षीही रोपांची लागवड होणार आहे. त्यासाठी ३१ लाख ५० हजार खड्डे १५ मेपर्यंत खोदण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत लावलेल्या रोपांपैकी किती रोपे सध्या जिवंत आहेत, हा संशोधनाचा विषय ठरावा. एकूणच जुन्याच खड्डय़ांत नवीन रोपे लावण्याचा हा फार्स ठरल्याचेच चित्र असून रोपे लागवडीच्या नावाखाली कोटय़वधी रुपये अक्षरश: ‘खड्डय़ात’ गेले आहेत!
जिल्ह्य़ात कृषी विभाग, सामाजिक वनीकरण व इतर विभागांमार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली दरवर्षी हा कार्यक्रम राबविला जातो. ‘एक व्यक्ती एक झाड’ हा राज्य सरकारचा संकल्प होता. याचा बराच गाजावाजा झाला. जि.प.चे तत्कालीन ‘सीईओ’ रमेश माज्रीकर यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन वृक्षारोपणाच्या नावाखाली कपात केले. त्यातून काय साध्य झाले याचा शोध ना जिल्हा प्रशासन घेते, ना वेतन देणारे घेतात!
गेल्या पावसाळ्यापूर्वी पाच पंचायत समित्यांतर्गत रोपवाटिकेत निर्माण केलेल्या रोपांची संख्या ६८ लाख ८ हजार होती. पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांची संख्या ८ लाख ५० हजार ३००, तर मार्चअखेर ९ महिने रोपांची १८ महिन्यांच्या रोपांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रस्तावित रोपांची संख्या २७ लाख ४ हजार ९५२, लागवडीनंतर शिल्लक रोपांची संख्या १ लाख २६ हजार ५० अशी नोंद आहे.
कार्यालयातील नोंदीअंतर्गत विवरणपत्र ब मध्ये गेल्या पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी ११ लाख ४१ हजार खड्डे खोदण्यात आले. यात पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांची संख्या ८ लाख ५० हजार ३०० आहे. विवरण पत्रकात जिल्ह्य़ात ४३४ रोपवाटिकांची संख्या आहे. निर्माण रोपांची संख्या ६८ लाख ८ हजार, पावसाळ्यात लागवड केलेल्या रोपांची संख्या ८ लाख ५० हजार ३००, तर उपलब्ध रोपांची संख्या २७ लाख ४ हजार ७७६ आहे. येत्या पावसाळ्यात लागवड केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या अपेक्षित रोपांची संख्या २७ लाख ४ हजार ७७६ अशी नोंद आहे. हिंगोली जिल्ह्य़ास साडेएकतीस लाख खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षीच होणारा वृक्षारोपण कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्षात कागदोपत्री आकडेमोड करून औपचारिकता पूर्ण करण्याचे काम यंत्रणेमार्फत होते. संगोपनासाठी रोपामागे ७५ रुपये किमान खर्च होतो. दरवर्षी वृक्षारोपणावर होणारा कोटय़वधीचा निधी अशा प्रकारे ‘खड्डय़ात’च जातो. जुन्याच खड्डय़ांत नवीन रोपांची लागवड केली जाते. या निधी खर्चाचे फलित काय? यावर सरकार गांभीर्याने विचार कधी करणार, असा जनतेचा सवाल आहे.

१५ मेपर्यंत विभागात  साडेतीन कोटींचे उद्दिष्ट
मराठवाडय़ात चालू वर्षी ३ कोटी ५० लाख रोपेलागवडीचे उद्दिष्ट आहे. यात १२ लाख खड्डे खोदण्याचे काम जि.प., कृषी विभाग ८ लाख, वन विभाग १० लाख, सामाजिक वनीकरण दीड लाख या प्रमाणे १५ मेपर्यंत खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट दिले आहे.