मार्चच्या पहिल्या पंधरवडय़ात गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले असले तरी या प्रक्रियेत शेवगा पिकांच्या नुकसानीची मोजदाद करावी की नाही, याबद्दल कृषी विभाग संभ्रमात आहे. सिन्नर तालुक्यात शेवग्याचे पंचनामे करण्यास नकार दिल्यामुळे काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसीलदार व कृषी विभागाकडे तक्रार केली. यामुळे संबंधितांच्या नुकसानीचे पंचनामे केले गेले असले तरी जिल्ह्यातील उर्वरित शेवगा उत्पादक अस्वस्थ आहेत. या संदर्भात कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनीही निकष तपासले जातील असे नमूद केले.  शेवगा हे फळपीक नसले तरी भाजीपाल्याच्या नुकसानीत समाविष्ट करता येईल असे काहींचे म्हणणे आहे. शेवगा फळपीक नसल्याने त्याला कोणत्या निकषात बसवावे याबद्दल कृषी विभागही संभ्रमात आहे.
नैसर्गिक संकटाने झालेल्या नुकसानीची भरपाई १ एप्रिलपासून दिली जाणार असल्याने पंचनाम्यांचे काम युध्द पातळीवर पूर्ण करण्यात आले. अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा जिल्ह्यातील ३८६ गावे बाधीत झाली आहेत. जवळपास २५ हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात द्राक्ष, कांदा, गहू, डाळिंब, भाजीपाला आदींचा समावेश आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत शेवगा पिकाकडे दुर्लक्ष झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. शेवगा हे फळपीक गटात मोडत नसल्याने त्याच्या नुकसानीपोटी शासकीय मदत दिली जाईल की नाही याबद्दल कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तलाठी वर्गात संभ्रम आहे. याच कारणामुळे सिन्नर तालुक्यातील शहा येथे शेवग्याच्या नुकसानीबद्दल पंचनामे करता येणार नाही अशी भूमिका संबंधितांनी घेतली होती. शेवगा शेतीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारे बाळासाहेब मराळे यांच्याबाबत ही घटना घडली. वास्तविक, मागील वर्षी नगर जिल्ह्यात शेवगा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली गेली होती. शेवग्याला भाजीपाला गटात समाविष्ट करून पंचनामे करता येतात. यामुळे नुकसानग्रस्त शेवगा पिकाचे पंचनामे करण्याची मागणी मराळे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली. त्याची दखल घेऊन बुधवारी त्यांच्या शेवगा शेतीतील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. हा अपवाद वगळता इतरत्र शेवगा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे झाले की नाहीत याची स्पष्टता झालेली नाही. या समस्येला जिल्ह्यातील समस्त शेवगा उत्पादकांना सामोरे जावे लागू शकते अशी धास्ती व्यक्त होत आहे.
कमी लागवड व देखभाल खर्च असणारे शेवगा हे कमी पाण्यात घेता येणारे पीक आहे. त्यावर रोगराई पडण्याचा फारसा धोका नसतो. जिल्ह्यात शेवग्याचे जवळपास दीड हजार एकर क्षेत्र आहे. नैसर्गिक संकटात त्यातील बहुतांश क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे न झाल्यास जी काही मदत मिळण्याची शक्यता आहे, ती देखील दुरापास्त होणार असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या संदर्भात कृषी विभागाशी संपर्क साधला असता एका अधिकाऱ्याने शेवगा हे फळपीक नसल्याने ते भाजीपाला गटात समाविष्ट करता येईल असे सांगितले. सिन्नर येथे घडलेल्या प्रकाराबद्दल स्थानिक पातळीवर काय निर्णय घेतला गेला याबद्दल माहिती घेतली जाईल असे ते म्हणाले. याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पंचनाम्याबाबत शासनाने दिलेल्या निकषांची पडताळणी करून शेवग्याचे पंचनाम्याबद्दल बोलता येईल असे नमूद केले. कृषी विभागात नुकसानग्रस्त शेवग्याचे पंचनामे करावे की नाही याबद्दल संभ्रमात आहे. परिणामी, उत्पादकांचा जीव टांगणीवर लागला आहे.