ज्येष्ठ साहित्यिक कवी नामदेव ढसाळ यांच्या निधनाने मराठी दलित साहित्यातील एका सिद्धहस्त लेखकास महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शोकसंदेशात विखे यांनी म्हटले आहे, की मराठी दलित साहित्यात परिवर्तन घडविणारा लेखक आणि क्रांतिकारी कवी अशीच ओळख नामदेव ढसाळांची होती. ऐन तारुण्यात दलित पँथरसारख्या संघटनेतून दलितांचे आणि शोषितांचे प्रश्न मांडून अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या लेखणीतूनही क्रांतिकारी विचार समाजापुढे मांडला. मराठीला समृद्ध करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी नामदेव ढसाळ यांचे नाव मराठी साहित्यात अजरामर राहील. त्यांच्या जाण्याने बोलीभाषेत लेखन करणारा दलित साहित्यिक गेल्याचे मोठे दु:ख आहे.