थकबाकीचे कारण दाखवून कृषिपंपाची वीज खंडित करू नये, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महावितरणचे स्थानिक अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, मोर्चातील शिष्टमंडळ अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता गर्दीत रेटारेटी होऊन गोंधळ उडाला. या वेळी काहीजणांना धक्काबुक्कीही झाली. एकूण परिस्थिती पाहून काही पुढाऱ्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
आमदार संतोष सांबरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हा किसान सेनाप्रमुख एकनाथ घुगे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, जि. प.चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर आदींची मोर्चासमोर भाषणे झाली. थकीत बिलाचे निमित्त करून कृषिपंपाची वीज खंडित करणे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे वक्तयांनी सांगितले.
शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले व बाला परदेशी, जिल्हा युवासेनाप्रमुख भाऊसाहेब घुगे, जगन्नाथ काकडे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे आदी मोर्चात सहभागी झाले होते.