वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत असून पाणीउपसा वाढल्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. ही बदलती स्थिती लक्षात घेऊन कृषिशास्त्रज्ञांनी भरीव कृषीसंशोधन करावे, असे आवाहन आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांनी केले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठात आयोजित कृषि संशोधन व विकास समितीच्या समारोप बैठकीत प्रा. खान बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे होते. परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव कोलते, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. आर. क्रांती, नवी दिल्ली येथील ‘अमिती’ विद्यापीठाचे संचालक डॉ. एम. एस. पॉल खुराणा, दापोलीच्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. टी. ए. मोरे उपस्थित होते.
कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस नागरिकांचा कल कमी होत आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यात कृषी संशोधनाची महत्त्वाची भूमिका आहे. कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनावर शेतकऱ्यांची भिस्त जास्त आहे. त्यामुळे कृषिशास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे, असे आवाहन मंत्री प्रा. खान यांनी केले. तत्पूर्वी विविध शास्त्रज्ञांकडून संशोधन शिफारसींचे वाचन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्मरणिकांचे विमोचन व कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. चारही कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ, प्राचार्य आदी उपस्थित होते.