मराठवाडा विकास आंदोलनाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाला संघर्षांचा इतिहास आहे. शेतीला स्वयंपूर्ण करावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्यास विद्यापीठाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी केले.
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित खरीप पीक शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन सोळंके यांच्या हस्ते झाले. कुलगुरू डॉ. के. पी. गोरे अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री फौजिया खान व डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, कुलसचिव के. व्ही. पागिरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, इफकोचे विभागीय व्यवस्थापक अरविंद ठाकरे उपस्थित होते.
संघर्षमय इतिहास असलेल्या विद्यापीठाने शेतीत मोठी क्रांती केली. शेतकऱ्यांनी तिचा लाभ घेऊन उत्पन्न वाढवले पाहिजे. शेतकऱ्यांनी जलसाक्षर होणे गरजेचे आहे. पाण्याचे जतन करेल, त्याचीच शेती भविष्यात टिकेल, असे सोळंके म्हणाले. परभणी जिल्ह्य़ात पीककर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याची कबुली देत सोळंके यांनी अशा बँकांबद्दल थेट तक्रारी करण्याचे आवाहन केले.
मंत्री सावंत यांनी विद्यापीठाच्या प्रगतीची प्रशंसा करून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठाने जबाबदारी उचलण्याचे आवाहन केले. शेतकरी समृद्ध झाला तरच विकास होईल. कृषी विद्यापीठ हे मराठवाडय़ाचा श्वास आहे, असे सांगत फौजिया खान यांनी विद्यापीठाचा दर्जा आणखी सुधारण्यास प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदवी देण्याआधी कमीत कमी ६ महिने ग्रामीण भागात शेतीवर प्रात्यक्षिक करणे बंधनकारक करावे, अशी सूचना श्रीमती खान यांनी केली. शेतीकामात यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे, असे डॉ. एल. पी. गीते म्हणाले. सोयाबीन आधारित उद्योगवाढीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक असल्याचे केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेंतर्गत असलेल्या सोयाबीन प्रक्रिया व वापर केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. गोरे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
राज्य सरकारचा कृषिभूषण पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या विविध पुस्तिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. माधुरी कुलकर्णी व डॉ. गीते यांनी सूत्रसंचालन केले.