गणेशोत्सवात कोकण मार्गावर पहिल्यांदाच चालवलेल्या वातानुकुलित डबलडेकर गाडीला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता ही गाडी पुणे किंवा नाशिक या मार्गावर चालवण्याचा विचार सुरू असल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. पुणे आणि नाशिक या दोन्ही मार्गावर याआधी डबलडेकर गाडी चालवण्यात येत होती. मात्र गेल्या काही वर्षांत ती गाडी बंद करण्यात आली. त्यामुळे सध्याची वातानुकुलित डबलडेकर गाडी चालण्यातही अडथळा येणार नाही, असा युक्तिवादही केला जात आहे. मात्र त्याच वेळी नाताळाच्या निमित्ताने मुंबई-गोवा या मार्गावरच डबलडेकर गाडी चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार असल्याचेही मध्य रेल्वेकडून स्पष्ट होत आहे.
कोकणात डबलडेकर गाडी चालवताना मध्य रेल्वेने ती प्रीमियम गाडी म्हणून चालवली. त्यामुळे प्रवाशांना चढय़ा दराचा सामना करावा लागला आणि ही गाडी केवळ १८ टक्केच भरली. मुंबई-गोवा मार्गावर एवढे कमी आरक्षण मिळाल्याने चक्रावलेल्या मध्य रेल्वेने आता या गाडीबाबत आणखी वेगळा विचार सुरू केला आहे. पुणे आणि नाशिकहून मुंबईला दर दिवशी येणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही गाडी या दोनपैकी एका मार्गावर चालवली जाऊ शकते, असे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र ही नवीन गाडी असल्याने दोन्ही मार्गांवरील घाटातील बोगद्यांमध्ये काही तांत्रिक अडचण येईल का याची खात्री करून घेण्यात येत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पुण्याला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसचे काही डबे काही वर्षांपूर्वी डबलडेकर होते. तसेच नाशिकला जाणारी पंचवटी एक्सप्रेसही डबलडेकर गाडी म्हणूनच चालवली जात असे. पुणे आणि नाशिक या दोन्ही मार्गावर घाट आहे. मात्र कोकण रेल्वेमार्गावरील घाट पार करून वातानुकुलित डबलडेकर गाडी करमाळीपर्यंत गेल्यामुळे ती पुणे अथवा नाशिकपर्यंत जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे सुरक्षाविषयक विभागाशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले.
ही गाडी मुंबई-पुणे किंवा मुंबई-नाशिक या मार्गावर चालवायची झाल्यास ती सध्याच्या डेक्कन क्वीनच्या धर्तीवरच चालवली जाईल. या गाडीला फार थांबे नसून या वातानुकुलित डबलडेकर गाडीचे भाडे इतर गाडय़ांच्या तुलनेत थोडेसे जास्त असू शकेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसून नाताळापर्यंत तरी ही गाडी मुंबई-गोवा मार्गावरच चालवण्यात येईल. त्यानंतर कोकण मार्गावर नेहमीच्या दरांत ही गाडी चालवण्याचा प्रयोग केला जाईल. त्यानंतरच ही गाडी इतर मार्गावर चालवण्याबाबत निर्णय होईल, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.