मुंबईच्या गर्दीत आणि उकाडय़ाच्या काहिलीत सुखकर प्रवासातून सुटका देणारे वातानुकूलीत गाडीचे स्वप्न रेल्वेमंत्र्यांनी दाखविले होते. हे स्वप्न वास्तवात कधी येणार, हे अद्यापही अधांतरीच आहे.
चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते कल्याण दरम्यान वातानुकूलित उपनगरी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या सहकार्य कराराच्या प्रतीक्षेत पडून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी हा करार होणार होता. मात्र अद्याप राज्य शासनाकडून त्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही. चर्चगेट ते विरारऐवजी ओव्हल मैदान ते विरार अशी एलिव्हेटेड गाडी सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले असून सहा वेगवेगळ्या कंपन्यांच्या निविदा सध्या आल्या असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात या कामाला मे २०१३ नंतर सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीएसटी ते कल्याण या मार्गावर एलिव्हेटेड रेल्वे सुरू करण्याची मागणी होत असूनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हार्बर मार्गावर हायस्पीड कॉरीडॉर सुरू करण्यास जास्त प्राधान्य दिले आहे. पनवेलजवळच्या प्रस्तावित विमानतळाच्या ‘कनेक्टिव्हिटी’स त्यांचे प्राधान्य आहे. रेल्वे प्रशासन सध्या दोन्ही मार्गापैकी कोणता मार्ग अधिक उपयुक्त आहे, हे तपासून पाहत आहे.  पूर्व-पश्चिम मुंबई जोडण्याबाबतही अद्याप काहीही झालेले नाही. वांद्रे येथून मानखुर्दपर्यंत उपनगरी रेल्वे सुरू करण्याबाबत अनेक वर्षांपासून प्रस्ताव पडून आहे. वांद्रे-कुर्ला संकुलापासून ही रेल्वे सुरू होणार असल्याचे गाजर वारंवार लोकप्रतिनिधींकडून दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वे अर्थसंकल्पामध्ये मुंबईचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याची लोकानुनयाची घोषणाच राहिली आहे.