पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध पक्षांचे बडे नेते विदर्भाच्या प्रचार दौऱ्यावर असल्याने विदर्भातील आकाशात विमान आणि हेलिकॉप्टरची मोठय़ा प्रमाणात रेलचल असून आठवडाभरापासून नागपुरातील हवाई वाहतुकीत दुप्पटीने वाढ झाली आहे.
प्रचारासाठी अवघे चार दिवस असल्याने प्रचाराला वेग आला असून, राजकीय नेत्यांच्या विदर्भातील आगमनाने नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्हीआयपी लाँऊझमधील राबता वाढला आहे.
नागपुरातील विमानळावर दररोज १८ विमानांचे आगमन आणि प्रस्थान होते. यामध्ये एअर इंडिया, एअर अरेबिया, इंडिगो, जेटलाईट, गो एअर या कंपन्यांची विमाने आहेत. गेल्या काही दिवसात या विमानतळावर विमान आणि हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली आहे. याविषयी विमानतळाचे मुख्य संचलन अधिकारी आभादेश प्रसाद म्हणाले, नियमित आणि अनियमित उड्डाण अशी वर्गवारी असते. दररोज उडणारी विमानांच्या व्यतिरिक्त विमानतळावर आगमन किंवा येथून प्रस्थान करणाऱ्या उड्डाणांची संख्या दररोज बदलत असते. गुरुवारी नागपूर विमानतळावरून १८ अनियमित उड्डाणे झाली. यात विमाने आणि हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी विदर्भात प्रचार सभा घेतल्या. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृह मंत्री राजनाथसिंग यांच्याही विदर्भात सभा झाल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, काँग्रेस नेते अजय माकन, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, आरपीआय (ए)चे रामदास आठवले, विदर्भात आले आहेत. याशिवाय बसपा प्रमुख मायावती यांची सभा विदर्भात झाली. याशिवाय अनेक पक्षांकडून क्रिकेटपटू, अभिनेत्री, अभिनेते आणि अनेक राजकीय पक्षांचे नेते इकडे येऊन गेल्याने विमानतळावरील विमाने आणि हेलिकॉप्टरची संख्या दुप्पटीने वाढली आहे.

पंतप्रधानांच्या ताफ्यात एक विमान आणि साधारणत: दोन ते तीन हेलिकॉप्टर असतात. शिवाय पंतप्रधानांचे विमान उडत असताना अन्य विमानांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे नागपूर विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (एटीसी) नियमित विमाने आणि अनियमित विमानांच्या आगाऊ नियोजनात व्यस्त आहे. विदर्भात प्रचारासाठी सुमारे १२ ते १५ हेलिकॉप्टर भाडय़ाने घेण्यात आली आहेत. गेल्या आठवडाभरापासून प्रचारसभेकरिता हेलिकॉप्टरचा वापर होत असून आणखी आठवडाभर असेच सुरू राहणार आहे.
मंदार भारदे,
व्यवस्थापकीय संचालक, मॅब एव्हिएशन प्रा. लि.