आम्हाला आव्हान का देता? तरणेताठे होतो तेव्हाच साडेतीन लाख मतांनी विजयी झालो होतो. आता तुमची मान-बीन व्यवस्थित राहू द्या, असा चिमटा काढताना लोकांनी तुम्हाला खासदार म्हणून लोकसभेत पाठवले. पाच वर्षांत तुम्ही काय दिवे लावले? रेल्वेसाठी आम्हीच केंद्राकडे विनंती करून काही निधी मिळवला. सिंचनासाठी तब्बल सव्वाशे कोटी निधी दिला. केवळ थापा मारल्या नाहीत. असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी खासदार गोपीनाथ मुंडे यांचा थेट नामोल्लेख न करता लगावला.
माजलगाव तालुक्यातील सोमठाणा येथे पवार यांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ झाला. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, संयोजक आमदार प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले की, मराठवाडय़ात आतापर्यंत ६५ हजार कोटींची कामे केली. बीड जिल्हय़ात ९ वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण केली. सिंचनासाठी तब्बल २ हजार १२५ कोटी निधी खर्च करून दीड लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली. रस्त्यांसाठी अडीचशे कोटी निधी देण्यात आला. कोकणच्या धर्तीवर नदीकाठचे रस्ते बनवले जाणार आहेत. भविष्यात मंत्री असो वा नसो, केलेल्या कामांबद्दल समाधानी आहे.
कोणी तरी येतो, आंदोलन करतो. रस्त्यावर उडय़ा मारतो. अशांना आम्ही जुमानत नाहीत. सध्या मराठा आरक्षणाबाबत अनेकांना पुळका आला आहे. राणे समितीला ५२ टक्के आरक्षणाला हात न लावता मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले पाहिजे, असे पवार म्हणाले. खासदार मुंडे यांचा थेट उल्लेख न करता बीडमधून आपल्याविरुद्ध लढावे, या त्यांच्या आव्हानाचा संदर्भ देत पवार म्हणाले की, १९९१ मध्ये आपण तरणेबांड असताना साडेतीन लाख मतांनी विजयी झालो. पाच वर्षांपूर्वी खासदार म्हणून तुम्हाला निवडून दिले. काय दिवे लावले? असा चिमटा मुंडेंचे नाव न घेता पवार यांनी काढला.
सोळंके यांचे शक्तिप्रदर्शन
आमदार सोळंके यांनी मेळाव्याला गर्दी जमवून पवार यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मात्र, मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव जगताप, तसेच राष्ट्रवादीचे मागील वेळचे लोकसभेचे उमेदवार रमेश आडसकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आमदार धनंजय मुंडे कर्ज प्रकरणात अडकल्यामुळे तेही हजर नव्हते.