आजरा तहसील कार्यालय गेले तीन महिने तहसीलदारांविना कार्यरत आहे. यामुळे नागरिकांची कामे लक्षणीय प्रमाणात खोळंबली आहेत. या कार्यालयाला नवीन तहसीलदाराची तत्पर नेमणूक करावी, या मागणीसाठी शुक्रवारी आजरा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. मोर्चाने आलेल्या शिवसैनिकांनी सोबत आणलेल्या खुर्चीवर ‘आजऱ्याला तहसीलदार कोण’ असा फलक लावून तहसीलदार नियुक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आजरा येथे दीपा भोसले या तहसीलदार होत्या. त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये शिवसेनेसह राजकीय पक्षही सहभागी झाले होते. सुमारे पाच दिवस तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले होते. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार भोसले यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
तथापि, भोसले यांच्या जागी नवीन तहसीलदाराची अजूनही नियुक्ती झालेली नाही. भोसले यांच्या कार्यकाळात बरीच कामे रखडली होती. तर त्यांच्या बदलीनंतर तहसीलदार नसल्याने कामांची पुरती वासलात लागली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची तसेच तसहील कार्यालयात विविध विकासकामे घेऊन येणाऱ्यांची भलतीच गोची झाली आहे. तहसीलदाराविना तहसील कार्यालय पोरके झाले आहे.
आजरा येथे नवीन तहसीलदाराची तत्पर नियुक्ती करावी, या मागणीसाठी शिवसेनेने आज आंदोलन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हे शिवसेना शेतकरी संपर्क यात्रेत व्यस्त आहेत. १५ जानेवारीपर्यंत ही संपर्क यात्रा चालणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जाऊन समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज तहसीलदाराच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आजरा बसस्थानकापासून निघालेला मोर्चा मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे तहसीलदार नियुक्तीच्या मागणीच्या घोषणा देण्यात आला.
आजरा तहसील कार्यालय तहसीलदाराच्या नियुक्तीपासून वंचित असल्याने आजऱ्याला तहसीलदार कोण, असे विचारणा करणारे फलक व खुर्ची शिवसैनिकांनी सोबत आणली होती. आंदोलनस्थळी नायब तहसीलदार जयवंत शिंगटे हे आल्यानंतर त्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आठवडय़ाभरात तहसीलदाराची नियुक्ती न झाल्यास तहसील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी दिला. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, दिलीप माने, तालुकाप्रमुख राजू सावंत, बाजी सावंत, सागर कुऱ्हाडे, वसंत नाईक, विलास हल्ल्याळे, जीवन पाटील, देवराज मारभगत यांच्यासह शिवसैनिक व नागरिक सहभागी झाले होते.