मराठी साहित्य, वाचक, लेखक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमींचा महाउत्सव असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यापूर्वी २१ वेळा महाराष्ट्राबाहेर झाले आहे. त्यात आता पहिल्यांदाच पंजाबची भर पडणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसे महाराष्ट्राबाहेरही मोठय़ा प्रमाणात पसरली असून त्यात प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांचा समावेश आहे. यापैकी बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, पणजी आदी ठिकाणी या अगोदर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आली होती. बेळगावमधील मराठी जनतेचा महाराष्ट्रात विलीन होण्यासाठीचा लढा अनेक दशके सुरू असल्याने तेथील मराठी साहित्य संमेलनालाही मराठी जनतेच्या दृष्टीने वेगळे महत्त्व आहे. १९२९, १९४६ आणि २००० साली बेळगावात ही संमेलने झाली. विशेष म्हणजे १९४६ मध्ये बेळगाव येथे ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात माडखोलकर यांनीच संयुक्त महाराष्ट्राचे सर्वप्रथम सूतोवाच केले होते.
महाराष्ट्राबाहेर असलेल्या मराठी भाषकांना मराठी भाषा, साहित्य याविषयी आपुलकी आहे. मुंबई, पुणे, नाशिक किंवा राज्याच्या अन्य भागांत जितक्या प्रमाणात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयक विविध कार्यक्रम होतात, तितक्या प्रमाणात ते महाराष्ट्राबाहेर होत नाहीत. त्यामुळे साहित्य संमेलनासारखा महाउत्सव राज्याबाहेर मराठी भाषक असलेल्या एखाद्या शहरात होतो तेव्हा स्थानिक मराठी मंडळींचा खूप मोठा प्रतिसाद संमेलन आणि संमेलनातील सर्वच कार्यक्रमांना मिळतो.
महाराष्ट्राबाहेर पहिले संमेलन १९०९ मध्ये काशिनाथ कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली बडोदा येथे झाले. त्यानंतर १९२१ मध्ये न. चिं. केळकर व १९३४ मध्ये नारायण गोविंद चापेकर यांच्या अध्यक्षतेखाली बडोदा येथेच संमेलने झाली.
यापूर्वी महाराष्ट्राबाहेर झालेली संमेलने व त्यांचे अध्यक्ष
इंदूर : गणेश जनार्दन आगाशे (१९१७),
बाळासाहेब पंतप्रतिनिधी (१९३५),
प्रा. डॉ. विजया राजाध्यक्ष (२०००).
ग्वाल्हेर : माधव श्रीहरी अणे (१९२८),
कुसुमावती देशपांडे (१९६१).
भोपाळ : वि. भि. कोलते (१९६७).
बेळगाव : शिवराम महादेव परांजपे (१९२९),
ग. त्र्यं. माडखोलकर (१९४६),
डॉ. य. दि. फडके (२०००).
कारवार : अनंत प्रियोळकर (१९५१).
हैदराबाद : श्रीधर व्यंकटेश केतकर (१९३१),
नरहर रघुनाथ फाटक (१९४७),
वामन लक्ष्मण कुलकर्णी (१९६५).
मडगाव : वामन मल्हार जोशी (१९३०),
वि. वा. शिरवाडकर (१९६४).
पणजी : प्रा. राम शेवाळकर (१९९४).
अहमदाबाद : प्रा. विठ्ठल दत्तात्रय घाटे (१९५३).
नवी दिल्ली : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९५४).