दहा वर्षांपूर्वी केवळ नागपुरातच नव्हे, तर देश-विदेशात बहुचर्चित झालेल्या अक्कू यादव खून प्रकरणाची सोमवारी न्यायालय परिसरातच नव्हे, तर साऱ्या शहरभर दिवसभर चर्चा होती. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निकालाने सुमारे १२ वर्षे जरिपटका परिसरातील या दहशतपर्वावर शिक्कामोर्तब केले आहे.   
कस्तुरबा नगरात राहणाऱ्या भारत उर्फ अक्कू कालीचरण यादव याची त्या परिसरात प्रचंड दहशत होती. त्याच्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. प्रारंभी छोटे-मोठे गुन्हे करणारा अक्कू १९९१ पासून गुन्हेगारी वर्तुळात सक्रिय झाला. सामूहिक बलात्कार, खून, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, खंडणी वसुली आदी २६ गंभीर गुन्हे तेव्हा त्याच्याविरुद्ध दाखल झाले. १९९१ मध्ये त्याच्या विरुद्ध ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई करून त्याला मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. एक वर्ष तो कारागृहात होता. त्याने या परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. रोज एका मुली वा महिलेला त्याच्या घरी जाऊन वासनेची शिकार व्हावे लागत होते. हे झाले नाही तर मारहाण केली जायची. अक्कूचे साथीदार कुठल्याही घरात शिरून मुलगी अथवा महिलेला उचलून आणायचे. भीतीमुळे कुणी त्याच्या विरुद्ध बोलत नव्हते. त्यामुळे तक्रारही व्हायची नाही.
काही प्रामाणिक पोलिसांनी अक्कूला हद्दपार केले होते. मात्र, राजकीय आणि खिसा गरम होत असल्याने काही पोलिसांकडून संरक्षण मिळत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाईही नगण्यच व्हायची. पैशाच्या जोरावर संरक्षण असल्याने अक्कूचे चांगलेच फावले होते. त्या भरवशावर त्याने गुंडगिरी करून त्या परिसरात त्याचे साम्राज्य प्रस्थापित केले होते. या आधारे त्याचे अत्याचार सुरू असल्याने लोक त्रस्त झाले होते. गरीब नागरिकांमध्ये आतून प्रचंड चिड खदखदत होती. त्यातूनच त्याचा गेम करण्याचा कट शिजत होता. अक्कू हद्दपार असताना ७ ऑगस्ट २००४ रोजी सदर पोलिसांनी त्याला सदर परिसरात पकडून जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दुसऱ्या दिवशी त्याला न्यायालयात आणले तेव्हा जेवणाच्या डब्यातून चाकू देण्याच्या प्रयत्नात त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली. अक्कूला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
अक्कूला १० ऑगस्टला पुन्हा न्यायालयात नेण्यात आले. तेव्हा जिल्हा न्याय मंदिर परिसरात जमाव शिरला आणि अक्कूवर धावून गेला. तेव्हा तेथे बंदोबस्तात असलेले तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्या प्रयत्नामुळे जमावाचा प्रयत्न फसला. १३ ऑगस्टला अक्कूला पुन्हा न्यायालयात आणण्यात आले. तेव्हा त्याच्यासोबत केवळ दोन पोलीस शिपाई होते. दोन-अडीचशे महिला-पुरुषांचा जमाव अक्कूच्या दिशेने धावला. जमाव चाल करून येत असल्याचे दिसताच त्या दोन शिपायांनी जिल्हा न्याय मंदिरातील दगडी इमारतीच्या उत्तरेकडील वऱ्हांडय़ात नेले. तेथील लोखंडी दार बंद करून घेतले. दुसरीकडील लाकडी दार तोडून जमाव आत शिरला. चाकू, भाल्याचे पाते, काचेच्या बाटल्या, दगड त्यांच्या हातात होते. ते पाहून तेथील एका कक्षात (यावेळी तेथे कामकाज सुरू नव्हते) अक्कूला घेऊन शिपाई शिरले व त्यांनी आतून दार लावून घेतले. जमावाने धक्के देत दार उघडले आणि आत अक्कूला जबर मारहाण करीत हातातील शस्त्रांनी त्याला ठार मारले. दगडाने ठेचून काढले. जमाव तेथून पळून गेला आणि कस्तुरबा नगरातील अक्कूचे घर जाळून टाकले.
या घटनेने प्रचंड खळबळ उडाली. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही या घटनेची प्रचंड चर्चा झाली. दंगल व खून आदी गुन्हे जरीपटका पोलिसांनी दाखल केले. एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेंद्र करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत आदींसह २१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यात वृद्ध महिलांचाही समावेश होता. त्यांच्या सुटकेसाठी नंतर पुन्हा आंदोलने, जाळपोळ झाली. हा तपास नंतर सीआयडीकडे देण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक बबन पोराटे (आता निवृत्त) यांनी तपास करून ७ डिसेंबर २००४ रोजी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना अजय मोहोड, देवांगना हुमणे, अंजना बोरकर यांची मृत्यू झाला. अठरा आरोपींविरुद्ध न्यायालयातखटला चालला.
अत्याचार करणाऱ्या गुंडांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने नागरिकांनीच पुढाकार घेऊन कायदा हातात घेणे सुरू केले. त्यानंतर जमावाकरवी गुंडांचा खात्मा करण्याच्या बऱ्याचघटना घडल्या. ‘त्याचा अक्कू यादव झाला’ असा वाक्प्रचारच रूढ झाला. अशा घटनांना नक्षलवाद्यांचे प्रोत्साहन असल्याचे बोलले जाऊ लागले. या घटनेनंतर न्यायालयाच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला. जिल्हा न्याय मंदिराच्या सभोवताल पक्की संरक्षण िभत बांधण्यात आली. आत व बाहेर जाण्यासाठी दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे ठेवण्यात आली.
इमारतीत जाणाऱ्यांची धातूशोधक यंत्राने तपासणी केली जाते. इमारतीत टप्प्याटप्प्यावर तसेच प्रवेशाच्या ठिकाणी पोलीस तैनात असतात. न्यायालय परिसरात एका पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली स्थायी बंदोबस्त तैनात करण्यात येतो. आधी न्याय मंदिर परिसरातील सुरक्षा यंत्रणेला सूचना दिल्यानंतरच आरोपीस तेथे नेले जाते.
या पाश्र्वभूमीवर केवळ न्याय मंदिर परिसरातच नव्हे शहरात सोमवारी सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. आरोपींना न्यायालय कुठली शिक्षा सुनावते याचे आराखडे बांधले जात होते. न्यायालय परिसरात नित्याचीच गर्दी होती. जमाव जमेल, असा अंदाज बांधून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आवळली होती. सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे, पोलीस निरीक्षक राठोड, के. आर. वाकसे त्याचप्रमाणे अविनाश चव्हाण यांच्यासह शंभराहून अधिक पोलीस परिसरात चौफेर लक्ष ठेवून होते. याशिवाय साध्या वेषातील पोलीस आकाशवाणी चौक व या परिसरात कानोसा होते. दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आज जमाव मात्र नव्हता. कस्तुरबा नगरात जरीपटका पोलीस तैनात होते.

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द