राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘जोगवा’, ‘पांगिरा’ अशा चित्रपटांनंतर आता राजीव पाटील दिग्दर्शित ‘७२ मैल एक प्रवास’ हा आणखी एक आगळ्यावेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. चिन्मय संत, स्मिता तांबे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
यासंदर्भात राजीव पाटील ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, हिंदी सिनेमातील सुपरस्टार अक्षय कुमार यांना गल्लाभरू नव्हे तर ‘चांगला सिनेमा’ मराठीत करण्याची इच्छा असावी ही खरोखरीच चांगली बाब आहे.  अश्विनी यार्दी-अक्षयकुमार यांच्या ग्रेझिंग गोट पिक्चर्सने ‘ओ माय गॉड’नंतर आता मराठी चित्रपट निर्मितीत पहिले पाऊल टाकले असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ यात दाखविण्यात येणार आहे. ‘जगण्याशी संबंधित’ हा सिनेमा आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.
अशोक व्हटकर लिखित ‘७२ मैल एक प्रवास’ या आत्मचरित्रपर कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपट २६ जुलैमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे थोडक्यात कथानक सांगताना पाटील म्हणाले की, तेरा वर्षांचा मुलगा साताऱ्यातील बोर्डिग स्कूलमधून पलायन करतो आणि चालत चालत कोल्हापूरला जातो. या त्याच्या प्रवासात त्याला भेटलेल्या व्यक्ती, विशेषत: राधाक्का ही महिला त्याला प्रवासात भेटते. तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव या मुलावर पडतो. या संबंध प्रवासात त्याला आयुष्य समजते. राधाक्काची व्यक्तिरेखा अभिनेत्री स्मिता तांबे यांनी साकारली आहे. जगण्याशी संबंधित विषयावरचा हा सिनेमा आहे. अक्षयकुमार-अश्विनी यार्दी यांच्यासारख्या बडय़ा निर्मात्यांबरोबर काम करतानाच्या अनुभवाबद्दल राजीव पाटील म्हणाले की, एक विषय पडद्यावर ज्या पद्धतीने मांडायचा आहे त्यासाठी लागणारा खर्च तडजोडी न करता करायला मिळणे आणि मनासारखा सिनेमा बनवण्यासाठी निर्मात्यांचा भक्कम पाठिंबा लागतो. असा पाठिंबा या सिनेमासाठी मला ग्रेझिंग गोट पिक्चर्सने दिलाच. परंतु, यापूर्वीही कॉपरेरेट पद्धतीच्या सिनेनिर्मिती कंपन्यांना आपण मराठी चित्रपट निर्मितीत आणू शकलो हे मला महत्त्वाचे वाटते. राजीव पाटील यांनी सनई चौघडे चित्रपटासाठी सुभाष घई यांना तर ‘जोगवा’ आणि ‘पांगिरा’द्वारे श्रीपाल मोराखिया यांच्या आयड्रीम प्रॉडक्शन्सला मराठी चित्रपट निर्मितीत आणले.