नुकतेच यवतमाळ तालुक्यातील महिलांनी मोठय़ा प्रमाणात दारूचे बंब जमा करून पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. यापाठोपाठ लाडखेड पोलीस ठाण्याअंतर्गत तिवसा येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार केल्यानंतर लाडखेडचे ठाणेदार व जमादारास निलंबित होण्याची वेळ आली. हा धडा जिल्ह्य़ातील मोझर येथील महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे.
सर्व महिलांनी एकत्र येऊन गावातील देशी दारू दुकान व गावठी दारूबंद करा, अशी मागणी रेटून धरली. ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच राजेश ढोकणे, पोलीस पाटील सुरेश वानखडे, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर चव्हाण, माजी सरपंच केशव मोहरकर, नारायण वंजारी, उपसरपंच मंगेश नेमाडे यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिलांनी आपल्या व्यथा कथन केल्या. दारूमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाचे अनुभव सांगितले. ‘मले एकटीले कामाले जा लागते. मी कामाले गेली नाही तं माया चिल्यापिल्याले जेवाले भेटत नाही. नवरा कमावते पन कमावले तेवढय़ाची दारू ढोसते’ दारू विकणाऱ्या बाया महागडय़ा साबनन आंघोय करतेत, आम्हाले साबनही भेटत नाही. मी कशी जगत आहे मायं मले माहीत, असे सांगत विमल वाढई ठाणेदारांसमोर रडली. अशा कित्येक महिलांनी धरणे देऊन आपापल्या व्यथा सांगितल्या. स्थानिक महादेव मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो महिला, नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.
गेल्या १५ दिवसांपासून मोझर येथे दारूबंदीची मोहीम तीव्र होत असून महिलांनी गावठी दारू विक्रेत्यांना इशारा दिला आहे. सर्व गावातील महिलांनी याबाबतचे निवेदनही ठाणेदाराला दिले होते. दारूबंदी कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी ही चळवळ तापवली आहेत. मोझर येथील देशीदारू दुकानदाराला दोन दिवसाचा इशारा दिला असून ही चळवळ वेगाने पेटत आहे. गावठी  दारू कायमची संपुष्टात आणण्यासाठी पोलीस प्रशासन पाठीशी राहील, असे आश्वासन ठाणेदारांनी दिले.