दररोज शेकडो पर्यटक येणाऱ्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृहात वन्यजीव विभागाने सुधारणा घडवून आणण्याऐवजी दर दिवशीच्या भाडय़ात वाढ करून पर्यटकांच्या खिशाला कात्री लावली असून दुसरीकडे राष्ट्रीय उद्यान परिसरात दारू आणि मांसाहाराला बंदी असतानाही विश्रामगृहाशेजारील मोकळ्या जागेवर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला बघावयास मिळत असल्याने वज्यजीव विभागाचे लक्ष कुणाकडे आहे, असे विचारण्याची वेळ आली आहे.
वन्यजीव विभागाने केलेल्या या दरवाढीमुळे विश्रामगृहात थांबणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे दिसत आहे. पर्यटकांसाठी वज्यजीव विभागाने तयार केलेल्या विश्रामगृहाच्या खोलीचे भाडे प्रति दिवस २०० रुपये होते. पण, गेल्या १० महिन्यांपासून यात वाढ करून ते ५०० रुपये करण्यात आले. ज्या पद्धतीने भाडेवाढ करण्यात आली, त्या तुलनेत त्या खोलीत सुखसुविधांचा मात्र अभावच बघावयास मिळतो. विश्रामगृहातील खोल्यांचे दरवाजे-खिडक्या तुटलेल्या असून त्या ठिकाणी लाकडी पट्टय़ा ठोकलेल्या आहेत. मागील बाजूस सर्वत्र कचरा दिसत असून दारूचे खोके व रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. स्वच्छतागृहाचेही दारे व खिडक्या तुटल्या असून स्वच्छतागृहाची िभत पडलेली आहे. दुरून येणाऱ्या पर्यटकांना नाईलाजास्तव या विश्रामगृहातील घाणीच्या साम्राज्यात राहण्यासाठी ५०० रुपये मोजावे लागत असून नेमक्या याच बाबीचा लाभ वन्यजीव विभाग घेत असल्याचा सूर पर्यटकांमध्ये व्यक्त केला जात आहे. बबनराव पाचपुते वनमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय उद्यान परिसरातील विश्रामगृहात व राष्ट्रीय उद्यानात दारू आणणे, मटण पार्टी करण्यावर बंदी आणली होती. परंतु, पतंगराव कदम यांच्या काळात येथे सर्रास ओल्या पाटर्य़ांना पुन्हा सुरुवात झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
उल्लेखनीय म्हणजे, नागपूर व गोंदिया येथील वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे नातेवाईक व स्नेही जेव्हा जेव्हा या राष्ट्रीय उद्यानात येतात तेव्हा ते सोबत दारूची पेटी, चिकन, मटण घेऊन येतात व विश्रामगृह स्वतच्या मालकीचे समजून त्या सर्व गोष्टी करताना पहायला दिसतात. राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी व कर्मचारी त्यांना कोणताच मज्जाव करीत नाहीत. मात्र, इतर पर्यटकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यास विसरत नाही. इतकेच नव्हे, तर इतर पर्यटकांची झडती प्रवेशद्वारावरच घेतली जाते. तसेच हॉलिडे होम १ ते ८ च्या मागे अनेक दारूच्या बाटल्या फेकलेल्या दिसतात. वास्तविक, एक फर्लागवर सब डीएफओ व स्वागताधिकाऱ्याचे कार्यालय आहे, तसेच स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांचे क्वार्टर्स असूनही स्वागत कार्यालयासमोर हॉलिडे होमला जाण्याअगोदर गेटवर वाहने तपासली जात नाही. लोकप्रतिनिधी व त्यांचे नातेवाईक तसेच कार्यकत्रे, अधिकाऱ्यांचे नातेवाईक त्या गेटवरील कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून आत प्रवेश करतात. हा परिसर स्वच्छ केला जात नाही. ही सत्य परिस्थिती असतानाही वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक मात्र गोंदियात कागदीघोडे नाचविण्यातच धन्यता मानत असल्याचा रोष पर्यटकांमध्ये आहे. त्यामुळे वनविभागातील वरिष्ठांनी राष्ट्रीय उद्यानातील विश्रामगृहाची व स्वच्छतागृहाची पाहणी करावी व त्यांची दुरुस्ती करून पर्यटकांची अडचण दूर करावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.