उरण तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी तसेच पदपथावर बसून चीअर्स करीत मद्याच्या पाटर्य़ा झोडल्या जाण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचा त्रास येथील नागरिकांना होत असून याबाबत त्यांनी संताप व्यक्त करीत, अशा बेशिस्त मद्यपींवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान करण्यास मनाई असतानाही उरण तालुक्यातील अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपान सुरू असल्याचे पाहावयास मिळते. येथे शाळा, महाविद्यालयाच्या शंभर यार्डाच्या आसपास तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असल्याच्या पाटय़ा लावण्यात आल्या आहेत परंतु असे असले तरी अनेक ठिकाणी शाळांच्या भिंतींना लागूनच पान सिगारेटची दुकाने आढळून येतात.  अनेकदा तरुणाई याच नाक्यांवर बसून धूम्रपान करीत असल्याचे दिसते. गुटख्यावर बंदी असली तरी गुटख्याचीही राजरोसपणे येथे विक्री केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी सध्या रोज संध्याकाळी मद्याच्या पाटर्य़ा झोडल्या जात आहेत. पार्टीत मद्यधुंद झाल्यानंतर रस्त्यावर दारूच्या बाटल्या फोडणे, मारामारी करणे, धुडगूस घालणे असे प्रकार येथे घडत आहेत. फुटलेल्या बाटल्यांचा काचा रस्त्यांवर, पदपथांवर विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या असतात, अशी माहिती येथील एक रहिवासी देवयानी पाटील यांनी दिली. मॉर्निग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यांना या सर्व प्रकारांमुळे रस्त्यांमुळे चालणे मुश्कील झाले आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक ठिकाणी तसेच पदपथावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बिट मार्शलची गस्त सुरू करण्यात आली असून असे प्रकार आढळल्यास त्वरित तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
जगदीश तांडेल, उरण