शासनाला पोलिसांची भरती करताना कॅबिनेटची परवानगी घ्यावी लागते. तसेच त्याच्यावर खर्चही खूप करावा लागतो. असे असले तरी जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस असतातच. मात्र त्याहीपेक्षा समाजातील दक्ष नागरिक हेच खरे पोलीस असतात, त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हे व अपराध घडण्यास मज्जाव होतो, असे मत नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उरण तालुक्यातील चिरनेर येथील नव्या पोलीस आऊट पोस्टच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. चिरनेर पोलीस आऊट पोस्टची चिरनेर येथील पी. पी. खारपाटील कंपनीने बांधणी केली आहे. या वेळी नवी मुंबई पोलीस उपायुक्त संजय येनपुरे, न्हावा शेवाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे, पी. पी. खारपाटील आदी उपस्थित होते.